नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट सध्या खूप चर्चेत आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) भारतीय खेळाडूंना बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) खेळण्याची परवानगी द्यायला हवी असे गिलख्रिस्टने म्हटले आहे. इंडियन प्रीमियर लीगचे (IPL)वेगळेपण जगासमोर दिसावे म्हणूनच बीसीसीआय भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग सारख्या विदेशी टी-२० लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी देत नाही. असा गंभीर आरोप देखील ॲडम गिलख्रिस्टने केला.
...तर IPL चाच विकास होईलगिलख्रिस्टने पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, "जर भारतीय खेळाडू विदेशी टी-२० लीगमध्ये सहभागी झाले तर खूप चांगले असेल यासाठी बीसीसीआयने परवानगी द्यायला हवी. मी वैयक्तिकपणे सांगू शकतो की असे केल्यास आयपीएलच्या वेगळेपणाला धोका पोहचणार नाही. जर भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया मधील टी-२० लीगमध्ये सहभागी झाले तर यामुळे त्यांचा केवळ 'ब्रँड' म्हणून विकास होईल. मात्र आपण सगळे एकाच वेळी देशांतर्गत लीग खेळवत आहे हे एक मोठे आव्हान आहे," अशा शब्दांत गिलख्रिस्टने भारतीय खेळाडू विदेशातील लीगमध्ये सहभागी व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली.
याआधी ॲडम गिलख्रिस्टने जागतिक क्रिकेटमध्ये आयपीएलच्या वाढत्या दबदब्यावर भाष्य केले होते. आयपीएलचे वाढते वर्चस्व जागतिक क्रिकेटसाठी धोकादायक असल्याचा त्याने गंभीर आरोप केला होता. मात्र मी जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग आयपीएलच्या विरोधात नसल्याचे गिलख्रिस्टने स्पष्ट केले. "मी आयपीएलचा अजिबात विरोध करत नाही मात्र भारतीय खेळाडू बीग बॅश लीगमध्ये येऊन का खेळत नाहीत? याचं मला कधीच स्पष्ट उत्तर मिळाले नाही. जगातील काही लीग जगभरातील प्रत्येक खेळाडूला खेळवत आहेत. मात्र इतर टी-२० लीगमध्ये कोणताही भारतीय खेळाडू का खेळत नाही? मी भडकावण्याचा प्रयत्न करत नाही मात्र एक प्रश्न विचारत आहे", असे गिलख्रिस्टने अधिक म्हटले.
IPL मुळे जागतिक क्रिकेट धोक्यातयापूर्वी गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरचा दाखला देख आयपीएलवर प्रश्न उपस्थित केले होते. डेव्हिड वॉर्नर या हंगामात बीग बॅश लीग मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसेच तो यूएईतील टी-२० लीगमध्ये खेळू शकतो. यूएईतील टी-२० लीगसाठी आयपीएलमधील फ्रँचायझी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स गुंतवणूक करणार आहेत. एकूणच आयपीएल मधील फ्रँचायझींकडून खेळण्यासाठी खेळाडूंचा कल अधिक असल्याने गिलख्रिस्टने संताप व्यक्त केला.