Suryakumar Yadav, Top 5 T20 Players: ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने जगातील 5 महान टी-20 खेळाडूंची निवड केली आहे. अॅडम गिलख्रिस्टने या यादीत केवळ एका भारतीय खेळाडूची निवड केली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अॅडम गिलख्रिस्टने सूर्यकुमार यादवसारख्या स्फोटक भारतीय खेळाडूला यात स्थान दिलेले नाही, तर टीम इंडियाच्या एका वेगळ्याच धडाकेबाज खेळाडूची निवड केली आहे. अॅडम गिलख्रिस्टने निवडलेल्या 5 महान टी-20 खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर रशीद खान, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा एक तडाखेबाज फलंदाज यांचा समावेश आहे.
गिलख्रिस्टच्या Top 5 मध्ये सूर्यकुमार ऐवजी 'या' खेळाडूला जागा
अॅडम गिलख्रिस्टने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड केली आहे. त्याने सूर्यकुमार यादवला स्थान दिलेले नाही. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या T20 World Cup 2022 आधी गिलख्रिस्टने हार्दिक पांड्याला एका धोकादायक आणि तडाखेबाज खेळाडू म्हटले आहे. रविवारी गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत सूर्यकुमारने पुन्हा भारतीय संघात महत्त्वाची भूमिका बजावली. या मालिकेसाठी हार्दिकला विश्रांती देण्यात आली आहे. असे असले तरी गिलख्रिस्टला यादीत हार्दिकने स्थान पक्के केले आहे.
हार्दिकला निवडण्याचं कारण काय...
सूर्यकुमारने आफ्रिकेविरूद्ध २२ चेंडूत ६१ धावा फटकावल्यामुळे भारताने २३७ इतकी मोठी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला १६ धावांनी पराभूत केले. तरीही, गिलख्रिस्टने हार्दिकलाच निवडले. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला की हार्दिक पांड्याच्या फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाच्या क्षमतेसाठी मी त्याची निवड करेन. हार्दिक पांड्या सध्या अष्टपैलू खेळाडूंच्या T20 क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळेच ऑलराऊंडर म्हणून गिलख्रिस्टने त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
गिलख्रिस्ट म्हणाला की, हार्दिक पांड्या एक दमदार खेळाडू आहे. त्याची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि मनोरंजनाची क्षमता नक्कीच चांगली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मला वाटते की त्याची आक्रमक वृत्ती, तो टॉप ऑर्डरमध्ये ज्या पद्धतीने डावाची सुरुवात करतो आणि गेल्या टी-२० विश्वचषकापासून त्याच्याकडे असलेला आत्मविश्वास, हे चांगले आहे. त्याच्याकडे सर्व फॉरमॅटमध्ये उत्तम प्रतिभा आहे. मला वाटते की तो सर्व परिस्थितीत चांगला खेळू शकतो. रशीद खान कोणत्याही टी-२० संघात असावा असाच आहे. बटलर अजूनही दुखापतीतून बरा होत आहे परंतु टी-२० विश्वचषकासाठी तो पूर्ण बरा होईल अशी अपेक्षा आहे.