पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुक्रवारी लेग स्पिनर आदिल राशिदने भारतीय कर्णधार विराट कोहलीला ६६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. यामुळे विराटच्या शतकाची प्रतीक्षा करणारे चाहते निराश झाले. राशिदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवव्यांदा कोहलीला बाद केले. कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (सर्व प्रकारात) सर्वाधिक वेळा बाद करणारा राशिद पहिला फिरकी गोलंदाज ठरला.
दरम्यान, पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतही राशिदच्या लेग स्पिनमुळे विराट अडचणीत आला होता. त्या मालिकेत राशिदने दोन वेळेस कोहलीची विकेट घेतली. कालच्या सामन्यात पुन्हा एकदा त्याने कोहलीची शिकार केली.
विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस बाद करणाऱ्या फिरकीपटूंमध्ये आदिल राशिदनंतर ग्रीम स्वान (आठ वेळा), मोईन अली (आठ वेळा), एडम झम्पा (सात वेळा) आणि नाथन लियॉन (सात वेळा) यांचा समावेश आहे. कोहलीला ज्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक वेळा बाद केले त्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी अव्वल स्थानावर आहे. त्याने सर्वाधिक १० वेळा आणि इंग्लंडचा अँडरसन याने आठ वेळा बाद केले आहे.