Join us  

IND vs PAK: ग्रुपमध्ये IND vs PAK सामना पाहिल्यास पाच हजारांचा दंड; NIT श्रीनगर प्रशासनाचा आदेश

आशिया चषकात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 4:09 PM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकामध्ये (Asia Cup 2022) आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने असणार आहेत. हा सामना आज संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. मात्र या बहुचर्चित सामन्यापूर्वीच सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. एनआयटी श्रीनगरने (NIT Srinagar) सुरक्षेच्या कारणास्तव नोटीस बजावली आहे की, विद्यार्थ्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जमाव करून पाहू नये. तसेच नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा आदेशस्टुडंट्स वेल्फेअरच्या डीनने जारी केलेल्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना सामना सुरू असताना वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, "दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. खेळाला खेळ म्हणून घ्या अशी आमची सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. वसतिगृहात कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करू नये."

दरम्यान, रविवारी सामन्याच्या दिवशी विद्यार्थ्यांना कॅम्पसममध्ये किंवा कॅम्पसबाहेर फिरता येणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर सामन्यांशी संबंधित पोस्ट न टाकण्यास सांगण्यात आले आहे. कारण मागील वर्षी विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान कॅम्पसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

५,००० रुपयांपर्यंत दंडाचा इशारा जारी केलेल्या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, नियमांचे उल्लंन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५,००० पर्यंत दंड होऊ शकतो. विद्यार्थी जमाव करून सामना पाहताना आढळल्यास त्यांना वसतिगृहातून बाहेर काढले जाऊ शकते. भारत आणि पाकिस्तानचा बहुचर्चित सामना आज दुबईच्या आंतरराष्ट्र्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे. टी-२० विश्वचषकात झालेल्या पराभवाचा बदला भारतीय संघ घेणार का हे पाहण्याजोगे असेल. 

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माबाबर आजमविराट कोहली
Open in App