चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. पावसाने पाणी फेरलेल्या सामन्यात मिळालेल्या एका गुणासह ऑस्ट्रेलियाच्या संघानं सेमीच तिकीट पक्के केले आहे. २००९ च्या हंगामात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद पटकवल्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघानं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाचे भवितव्य जवळपास संपुष्टात आले आहे. टेक्निकल कॅलक्युलेशननुसार, 'जर-तर'च्या समीकरणात त्यांचे आव्हान टिकून आहे. जर इंग्लंडच्या संघानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले तर अफगाणिस्तानला आणखी एक संधी मिळू शकते. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं या गोष्टीवरच अफगाणिस्तानचं भवितव्य टिकून आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ स्वबळावर सेमी गाठण्याची संधी गमावेल, असे वाटत नाही. इंग्लंडला पराभूत करून ते 'ब' गटात टॉपला जाण्यासाठी प्रयत्नशील असतील. या सामन्यात पावसाचा व्यत्य आला तर दक्षिण आफ्रिका या गटातून सेमीत दाखल होणारा दुसरा संघ ठरेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अफगाणिस्तानच्या संघानं सेट केले होते टार्गेट, पण...
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित ५० षटकात २७३ धावा केल्या होत्या. सेदीकुल्ला अटल (Sediqullah Atal) ९५ (८५) आणि अझमतुल्लाह ओमरझाई (Azmatullah Omarzai) ६७ (६३) या दोघांनी अफगाणिस्तानकडून कडक अर्धशतके ठोकली. अफगाणिस्तानचा संघ २७० धावांचा बचाव करुन इतिहास रचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना अर्धा तास पडलेल्या पावसाने खेळच बिघडवला. पाऊस थांबला पण मैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आले.
ट्रॅविस हॅडच्या कडक बॅटिंगनंतर पावसाने लावली हजेरी, मग...
अफगाणिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मॅथ्यू शॉर्ट आणि ट्रॅविस हेड या जोडीनं ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली असताना अझमतुल्लाह ओमरझाई याने मॅथ्यू शॉर्टच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. राशीद खान याने ट्रॅविस हेडचा कॅच सोडला. याचा फायदा उठवत हेडनं आयसीसी स्पर्धेचा किंग असल्याचे दाखवून देत पुन्हा एकदा दमदार अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियन संघाने १२.५ षटकात एका विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १०९ धावा लावल्या होत्या. यावेळी ट्रॅविस हेड ४० चेंडूत नाबाद ५९ धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या बाजूला स्मिथ २२ चेंडूत १९ धावा करून मैदानात होता. मग पावसाने बॅटिंग सुरु केल्यावर या जोडीसह अफगाणिस्तानच्या खेळाडूंना मैदान सोडावे लागले. पाऊस उघडला पण आउटफिल्डवरील ओलावा कायम राहिल्यामुळे शेवटी सामना रद्द करण्याचे जाहीर करत दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला. या एका गुणासह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ३ सामन्यानंतर १ विजय आणि २ अनिर्णित सामन्यातील दोन गुणांसह ४ गुण जमा झाले अन् त्यांनी सेमी फायनलचे तिकीट पक्के केले.
अफगाणिस्तानचं काय?
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर मिळालेल्या एका गुणासह अफगाणिस्तानच्या खात्यात ३ सामन्यानंतर आता ३ गुण जमा झाले आहेत. सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात २ सान्यानंतर ३ गुण जमा आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ साखळी फेरीतील अखेरचा सामना इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना जिंकून ते ५ गुणांसह 'ब' गटात अव्वल स्थानावर पोहचू शकतात. दुसरीकडे जर इंग्लंडनं त्यांना मोठ्या फरकाने पराभूत केले तर नेट रनरेटच्या जोरावर अफगाणिस्तानला एक संधी निर्माण होऊ शकते. पण याची शक्यता फारच कमी आहे.