Rain stopped Play, Afghanistan vs New Zealand Test Day 3: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला. हवामानाची परिस्थिती पाहता कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकर करण्यात आली. हा सामना ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. ओल्या आऊटफिल्डमुळे पहिल्या दोन दिवसांचा खेळ आधीच वाया गेला होता. त्यानंतर सततच्या पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द झाला.
१६ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये हे घडले
कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल १६ वर्षांनंतर असे घडले की कसोटीच्या पहिल्या तीनही दिवसांचा खेळ रद्द केला गेला. २००८ मध्ये शेवटच्या वेळी कसोटी सामन्यातील पहिल्या तीन दिवसांचा खेळ रद्द करण्यात आला होता. त्या सामन्यात देखील एक संघ न्यूझीलंडचा होता. मीरपूर येथे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात हा कसोटी सामना रंगला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामन्यावर ही नामुष्की ओढवली.
कसोटीचा निकाल लागण्याची शक्यता नगण्य
भारतीय वेळेनुसार, तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याची घोषणा सकाळी ९.१५ वाजताच करण्यात आली. सततच्या पावसामुळे मैदानाची अवस्था बिकट झाल्याने सामनाधिकारी आणि पंचांनी मिळून सकाळीच हा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या दिवशी खेळ न झाल्यामुळे सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता नगण्यच आहे. सध्याची परिस्थिती पाहता सामन्यात पाच दिवसात मिळून एक चेंडूचा खेळ तरी होणार का, हाच मोठा प्रश्न आहे.