AFG vs NZ Test : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ एक कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात आले आहेत. भारताने किवी संघाविरुद्धच्या सामन्याचे यजमानपद अफगाणिस्तानला नोएडा येथील विजय सिंह पथिक स्टेडियम दिले होते. हा सामना ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीत होणार होता मात्र दोन दिवस उलटूनही हा सामना सुरू होऊ शकला नाही. अशातच आता स्टेडिअममधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोएडा स्टेडियममधील कर्मचारी टॉयलेटच्या वॉश बेसिनमध्ये भांडी धुत असल्याचा दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी निवडलेले ग्रेटर नोएडाचे शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यास अजिबात तयार नसल्याचे समोर आलं आहे. दोन संघांमध्ये सोमवारपासून येथे कसोटी सामना खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. त्यातच आता स्टेडियममध्ये मीडिया आणि इतर लोकांसाठी केलेल्या व्यवस्थेचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. स्टेडिअममध्ये मीडिया आणि इतर विभागांच्या पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था वाईटापेक्षा वाईट आहे. केटरिंगची भांडी शौचालयाच्या पाण्याने धुत असल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या स्टेडिअमच्या वॉशरूमचे काही छायाचित्रे फोटो व्हायरल झाले असून त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. केटरिंग कर्मचारी स्टेडियममध्येच बांधलेल्या वॉशरुमच्या वॉश बेसिनमध्ये जेवणाची भांडी धुत असल्याचा हा फोटो आहे. भांडी धुत असलेल्या ठिकाणीच शेजारी शौचाची व्यवस्था करण्यात आल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. या सगळ्या प्रकारामुळे स्टेडियमधील व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार पूर्णपणे उघड झाला आहे.
दुसरीकडे या स्टेडियमचे आउटफिल्ड अजूनही ओलेच असल्याचे समोर आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून इथे पाऊस झालेला नाही. तरीही या स्टेडियमचे आऊटफिल्ड अजून कोरडे होऊ शकलेले नाही. त्यामुळे दोन दिवस टॉस देखील होऊ शकलेला नाही. खराब व्यवस्था आणि अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे दोन्ही संघाचे खेळाडू प्रचंड नाराज झाले आहेत.