afg vs sa odi 2024 : मागील काही दिवसांपासून क्रिकेट विश्वाला धक्का देण्याची परंपरा अफगाणिस्तानने कायम ठेवली आहे. २०२३ च्या विश्वचषकात पाकिस्तान आणि इंग्लंडचा पराभव करुन अफगाणिस्तानने हम किसी सें कम नही हे दाखवून दिले होते. त्यानंतर ट्वेंटी-२० विश्वचषकात त्यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा करेक्ट कार्यक्रम केला होता. आता दक्षिण आफ्रिकेचा वन डे मालिकेत २-० असा पराभव करुन अफगाणिस्तानने इतिहास रचला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने सहज विजय नोंदवला. प्रथम रहमानुल्लाह गुरबाजचे शतक त्यानंतर सामनावीर राशिद खानचा पराक्रम यामुळे आफ्रिकीची पळता भुई थोडी झाली. राशिदने पाच बळी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय अफगाणिस्तानचा नवखा गोलंदाज नांगेयालिया खारोटेने चार बळी पटकावले.
सध्या दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जात आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकून अफगाणिस्तानने मालिका खिशात घातली. त्यामुळे अखेरचा सामना म्हणजे केवळ औपचारिकता असेल. खरे तर अफगाणिस्तानने इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा वन डे मालिकेत धुव्वा उडवला. या मालिकेतील तिसरा सामना २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.
दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३११ धावा केल्या. रहमानुल्लाह गुरबाज (१०५), अजमतुल्लाह ओमरजई (८६) आणि रहमत शाहने (५०) धावा केल्या. अफगाणिस्तानने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ३४.२ षटकांत अवघ्या १३४ धावांत गारद झाला. अफगाणिस्तानकडून राशिद खानने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर नांगेलिया खारोटे (४) आणि अजमतुल्लाह ओमरजईला एक बळी घेण्यात यश आले.
अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक वन डे शतक
रहमानुल्लाह गुरबाज - ७
मोहम्मद शहजाद - ६
इब्राहिम झादरान - ५
रहमत शाह - ५
Web Title: afg vs sa odi 2024 Afghanistan beat South Africa in ODI series, Rashid Khan takes five wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.