AFG vs SL Live : आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना रोमहर्षक झाला. अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २९२ धावांचे लक्ष्य होते, परंतु सुपर ४ साठी त्यांना ते ३७.१ षटकांत पूर्ण करायचे होते. दोन्ही सलामीवीर एकेरी धावेत माघारी परतले. मात्र, मोहम्मद नबीने वन डेतील वेगवान अर्धशतक झळकावताना कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीसह मॅच खेचून आणली. शाहिदीला त्याआधी रहमत शाहने चांगली साथ दिली. अफगाणिस्ताचा प्रत्येक फलंदाज आज इतिहास घडविण्याच्या निर्धाराने खेळताना दिसला. पण, श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेलालगेने एका षटकात दोन मोठ्या विकेट्स घेत सामना फिरवला. मात्र, अफगाणिस्तानने अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली. श्रीलंकेने ३७.४ षटकांत अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ २८९ धावांवर गुंडाळून सुपर ४ मध्ये धडक मारली.
कसून राजिथाने त्यांना २७ धावांवर दोन धक्के दिले. गुलबदीन नैब ( २२) व रहमत शाह यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहमत ( ४५) व कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांनी ७१ धावा जोडल्या. सेट फलंदाज माघारी परल्याने अफगाणिस्तानचे जिंकण्याचे स्वप्न पुसट होत चालले होते. पण, शाहिदी आणि मोहम्मद नबी यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. दासून शनाकाच्या एका षटकात दोघांनी २६ धावा कुटल्या. नबीने २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि अफगाणिस्तानकडून वन डेतील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
नबी श्रीलंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता. हे वादळ रोखण्यासाठी श्रीलंकेने फिरकीपटू महिशा थीक्षाणाला आणले अन् अपेक्षित निकाल मिळाला. नबीने टोलावलेला चेंडू धनंजयाने अप्रतिमरित्या टिपला अन् नबी ३२ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६५ धावांवर माघारी परतला.
शाहिदीनेही ५१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आता अफगाणिस्तानला सुपर ४ साठी ६० चेंडूंत ८८ धावा करायच्या होत्या. शाहिदीला आला युवा फलंदाज करीम जनतची साथ मिळाली. श्रीलंकेचा कर्णधार प्रमुख गोलंदाजांना घेऊन अफगाणिस्तानच्या धावांना चाप लावण्याची रणनीती आखताना दिसला. युवा फिरकीपटू दुनिथ वेलालगेच्या चेंडूवर फटका मारण्याचा जनतचा ( २२) प्रयत्न फलसा अन् तो झेलबाद झाला. वेलालगेने आणखी एक विकेट मिळवून दिली आणि यावेळी सेट फलंदाज शाहिदी ( ५९) झेलबाद झाला. हा अफगाणिस्तानसाठी मोठा धक्का होता.
आता ३१ चेंडूंत ५४ धावा अफगाणिस्तानला हव्या होत्या. राशीदने ३३व्या षटकात पथिराणाला षटकार खेचला, त्यात नजीबुल्लाह झाद्रानही पार्टीत सहभागी झाला. १३ चेंडू २७ धावा असं समीकरण दोघांनी जुळवून आणलं. ३ विकेट्स घेणाऱ्या राजिथाने टाकलेल्या ३२व्या षटकात दोघांनी ११ धावा चोपल्या. पण, राजिथाने १५ चेंडूंत २३ धावा कुटणाऱ्या झाद्रानला बाद केले अन् बदली खेळाडू मदी हेमंथाने अविश्वसनीय झेल घेतला. ७ चेंडूंत १५ धावा हव्या होत्या आणि राशीदवर आता सर्व मदार होती. चेंडू वेलालगेच्या हाती सोपवला. त्याचे पहिले दोन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर राशीदने ४,०,४,४ असे फटके मारले. त्यांना १ चेंडूंत ३ धावा करायच्या असताना मुजीब झेलबाद झाला. पण, तरीही ३७.२ षटकांत षटकार मारून त्यांना सुपर ४ मध्ये जाण्याची संधी होती. पण, त्यांनी तीही गमावली.
तत्पूर्वी, पथूम निसंका ( ४१) आणि दिमुथ करुणारत्ने ( ३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. कुसल मेंडिस व चरिथ असलंका ( ३६) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मेंडिसने ८४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावा केल्या. त्याला दुर्दैवीरित्या रन आऊट व्हावे लागले. दुनिथ वेल्लालागे ( ३३*) व महीष थीक्षणा ( २४) यांनी आठव्या विकेटसाठी ५०+धावांची भागीदारी केली आणि श्रीलंकेला ८ बाद २९१ धावांपर्यंत पोहोचवले. अफगाणिस्तानच्या राशीद खानने ६३ धावांत २, तर गुलबदीन नैबने ६० धावांत ४ विकेट्स घेतल्या.
Web Title: AFG vs SL Live : SRI LANKA HAVE QUALIFIED FOR THE SUPER 4S in Asia Cup 2023, they defeated Afghanistan by just 2 runs!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.