AFG vs SL Live : आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका ही मॅच कमालीची चुरशीची होताना दिसतेय... लाहोर येथे सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानला मोठा पाठिंबा मिळतोय आणि त्यांचा खेळही तसा बहरताना दिसला. ३३ व्या षटकापर्यंत श्रीलंकेची सामन्यावर पकड होती, परंतु ग्रह फिरले अन् अफगाणिस्तानने जबरदस्त कमबॅक केले. कुसल मेंडिस ( Kusal Mendis) याचा ९२ धावांवर दुर्दैवी रन आऊट कलाटणी देणारा ठरला. राशीद खानने ६३ धावांत २, तर गुलबदीन नैबने ६० धावांत ४ विकेट्स घेतल्या.
सुपर ४ मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवश्यक आहे आणि त्यामुळे कडवी टक्कर पाहायला मिळाली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पथूम निसंका आणि दिमुथ करुणारत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. ११व्या षटकात गुलबदीन नैबने श्रीलंकेला पहिला धक्का देताना करुणारत्नेला ( ३२) बाद केले. कुलस मेंडिस आणि निसंका यांची जोडी जमण्याआधीच तुटली. निसंका ( ४१) नैबच्या गोलंदाजीवर बाद झाला. सदीरा समरविक्रमान ( ३) आज अपयशी ठरला. पण, मेंडिस व चरिथ असलंका यांनी डाव सारवला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ३३व्या षटकापर्यंत सामना श्रीलंकेच्या हातात होता.
३४व्या षटकात राशिद खानने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपला अन् असलंका ( ३६) बाद झाला. त्यानंतर मुजीब उर रहमानने धनंजया डी सिल्वाचा ( १४) दांडा उडवला. राशीदच्या ४०व्या षटकात श्रीलंकेला दोन धक्के बसले. कर्णधार दासून शनकाने सरळ मारलेला चेंडू झेल टिपण्याचा राशीदने प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या हातून निसटून नॉन स्ट्रायकर एंडला यष्टिंवर आदळला. मेंडिसने क्रिज सोडले होते अन् त्याला रन आऊट होऊन माघारी जावे लागले. त्याने ८४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावा केल्या. पाठोपाठ शनाकाही ( ५) त्रिफळाचीत झाला. दुनिथ वेल्लालागे ( ३३*) व महीष थीक्षणा ( २४) यांनी आठव्या विकेटसाठी ५०+धावांची भागीदारी केली आणि श्रीलंकेला ८ बाद २९१ धावांपर्यंत पोहोचवले.
सुपर ४ चे समीकरण...
ब गटातून बांगलादेशने २ गुणांसह ०.३७३ च्या नेट रनरेटने सुपर ४ मध्ये जागा पक्की केली आहे. दुसऱ्या स्थानासाठी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस आहे. श्रीलंकेने पहिला सामना जिंकून ०.९५१च्या नेट रन रेट व २ गुणांसह अव्वल स्थान टिकवले आहे, तर अफगाणिस्तानने १ सामना गमावला आहे.
Web Title: AFG vs SL Live : Sri Lanka post 291/8 (Kusal Mendis 92; Gulbadin Naib 4/60), Afghanistan need to chase 292 down in a maximum of 37.1 overs to make the Super Fours.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.