afg vs sl | पुणे : इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर अफगाणिस्तानने श्रीलंकेला देखील चीतपट केले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभव करून मोठा धक्का दिला. आजच्या पराभवामुळे श्रीलंकेच्या उपांत्य फेरीत प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकेला केवळ २४१ धावांत गारद केले, त्यात फजलहक फारुकीने महत्त्वाची भूमिका बजावताना चार बळी घेतले. श्रीलंकेने दिलेल्या २४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा चमक दाखवली. अफगाणिस्तानने ७ गडी राखून श्रीलंकेचा पराभव करून प्रथमच विश्वचषकात तीन सामने जिंकण्यात यश मिळवले.
श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला रहमानउल्ला गुरबाजच्या रूपात सुरूवातीलाच मोठा झटका बसला. पण त्यानंतर रहमत शाहने (६२) अप्रतिम खेळी करून अफगाणिस्तानच्या चाहत्यांच्या आशा कायम ठेवल्या. विजयाकडे कूच करत असलेल्या अफगाणिस्तानला पुन्हा एकदा धक्का देण्यात श्रीलंकेला यश आले अन् सेट फलंदाज रहमत बाद झाला. पण कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (५८) आणि अजमतुल्ला उमरझाई (७३) अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. चार बळी घेऊन श्रीलंकन फलंदाजांना घाम फोडणाऱ्या फजलहक फारुकीचा समनावीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
तत्पुर्वी, अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने १० षटकांत ३४ धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. मुजीब उर रहमानला २ बळी घेण्यात यश आले तर राशिद खान आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेऊन श्रीलंकेला गारद केले. २०१९ च्या विश्वचषकात एकही विजय मिळवण्यात यश आले नसले तरी यंदा अफगाणिस्तानचा संघ नव्या उमेदीने मैदानात उतरला अन् गतविजेत्यांना देखील त्यांनी पराभूत केले. अफगाणिस्तानने ६९ धावांनी इंग्लंडचा पराभव करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. याशिवाय पाकिस्तानला ८ गडी राखून पराभवाची धूळ चारून शेजाऱ्यांना दे धक्का देत अफगाणिस्तानने नवा इतिहास रचला. विश्वचषकाच्या इतिहास प्रथमच अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर, सोमवारी श्रीलंकेला पराभूत करून अफगाणिस्तानने उपांत्य फेरीच्या शर्यतीतील आपले स्थान कायम ठेवले आहे.
सुरूवातीपासूनच सावध खेळी करत असलेल्या श्रीलंकेला कोंडीत पकडण्यात अफगाणिस्तानला यश आले. सलामीवीर पथुम निसांका (४६) वगळता एकाही श्रीलंकेच्या फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार कुसल मेंडिसने (३९) डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण मुजीब उर रहमानने श्रीलंकन कर्णधाराला बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय लयमध्ये वाटत असलेल्या सदीरा समरविक्रमाला (३६) बाद करण्यातही रहमानला यश आले. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कमाल करत श्रीलंकेच्या फलंदाजांची डोकेदुखी वाढवली. फजलहक फारुकीने १० षटकांत ३४ धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. मुजीब उर रहमानला २ बळी घेण्यात यश आले तर राशिद खान आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेऊन श्रीलंकेला गारद केले.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ -कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महीश तीक्ष्णा, कसुन राजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.
आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.