Join us  

AFG vs SL : अफगाणिस्तान आणखी एक धक्का देणार? फजलहक फारुकीचा 'चौकार' अन् श्रीलंका गारद

आज वन डे विश्वचषकात नंबर पाच विरूद्ध नंबर सात अशी लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 6:02 PM

Open in App

आज वन डे विश्वचषकात नंबर पाच विरूद्ध नंबर सात अशी लढत होत आहे. आशियाईतील दोन संघ पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आमनेसामने आहेत. खरं तर अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्हीही संघांनी प्रत्येकी ५-५ सामने खेळले असून २-२ सामने जिंकले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे दोन्हीही संघांनी गतविजेत्या इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे नव्या उमेदीने आज मैदानात उतरले. पण, चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या अफगाणिस्तानने श्रीलंकेला केवळ २४१ धावांत गारद केले, त्यात फजलहक फारुकीने महत्त्वाची भूमिका बजावताना चार बळी घेतले. 

सुरूवातीपासूनच सावध खेळी करत असलेल्या श्रीलंकेला कोंडीत पकडण्यात अफगाणिस्तानला यश आले. सलामीवीर पथुम निसांका (४६) वगळता एकाही श्रीलंकेच्या फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार कुसल मेंडिसने (३९) डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण मुजीब उर रहमानने श्रीलंकन कर्णधाराला बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय लयमध्ये वाटत असलेल्या सदीरा समरविक्रमाला (३६) बाद करण्यातही रहमानला यश आले. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कमाल करत श्रीलंकेच्या फलंदाजांची डोकेदुखी वाढवली. फजलहक फारुकीने १० षटकांत ३४ धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. मुजीब उर रहमानला २ बळी घेण्यात यश आले तर राशिद खान आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेऊन श्रीलंकेला गारद केले. 

अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर कोणत्याच श्रीलंकन फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. पण, चरिथ असलंका (२२), धनंजय डी सिल्वा (१४), अँजेलो मॅथ्यूज (२३) आणि महेश तीक्ष्णा (२९) यांनी छोटी पण महत्त्वाची खेळी करून अफगाणिस्तानसमोर सन्मानजनक लक्ष्य ठेवले. श्रीलंकेला निर्धारित ५० षटके देखील खेळता आली नाहीत अन् त्यांचा संघ ४९.३ षटकांत २४१ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयाची हॅटट्रिक लगावण्यासाठी २४२ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वाला आणखी एक धक्का देऊन विजय मिळवण्याचे आव्हान अफगाणिस्तानसमोर असणार आहे. अफगाणिस्तानने या आधीच्या सामन्यांमध्ये गतविजेत्या इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आजचा सामना त्यांना विजयाची हॅटट्रिक साजरा करण्याचा आनंद देतो का हे पाहण्याजोगे असेल.

आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ - कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महीश तीक्ष्णा, कसुन राजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका. 

आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानश्रीलंका