-ललित झांबरे
अफगणिस्तानचा संघ आपला पहिलाच कसोटी सामना सध्या बंगळुरूत भारताविरुद्ध खेळतोय. असे असले तरी 1960 मध्येच एक अफगाणी क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट खेळलाय यावर तुमचा विश्वास बसेल का!नाही ना...पण हे खरे आहे आणि हा पहिला अफगाणी टेस्ट क्रिकेटर आहे त्यांच्या जमान्यातला हँडसम ऑलराऊंडर सलीम दुर्राणी! त्यामुळे असगर स्तानीक्झाई आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पहिली कसोटी खेळत असूनही पहिलेच अफगाणी कसोटीपटू (टेस्ट क्रिकेटर) होण्याचा मान हुकलाय.
आता सलीम दुर्राणींना हा मान कसा काय, तर ते जन्माने अफगाणी आहेत. काबूल ही त्यांची जन्मभूमी. नंतर ते भारतात आले आणि सौराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानसह भारतासाठी खेळले. प्रेक्षकांच्या मागणीनुसार हवा त्या ठिकाणी षट्कार मारणारा खेळाडू म्हणून नावलौकिक कमावलेल्या सलीम यांनी 1960 ते 1973 दरम्यान भारतासाठी 29 कसोटी सामने खेळले आणि 1961-62 चा इंग्लंडविरुद्धचा मालिका विजय व 1971-72 च्या पोर्ट अॉफ स्पेन कसोटीत वेस्ट इंडिजविरुध्दच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले. इंग्लडविरुध्दच्या मालिकेत कोलकाता कसोटीत त्यांनी 8 विकेट तर चेन्नई कसोटीत 10 विकेट काढल्या होत्या तर पोर्ट अॉफ स्पेन कसोटीत क्लाईव्ह लॉईड व गॕरी सोबर्स यांना बाद करुन भारताच्या ऐतिहासिक विजयाचा मार्ग त्यांनी सुकर केला होता.
त्यांच्या काळात सलीम दुर्राणी एवढे लोकप्रिय होते की ते हिंदी सिनेमात हिरो म्हणूनही (चरित्र 1973) झळकले होते. अभिनेत्री परवीन बाबीसोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चा त्या काळात रंगल्या होत्या आणि त्यांना भारतीय संघातून वगळल्यावर 1973 च्या कानपूर कसोटीवेळी 'नो दुर्राणी, नो टेस्ट ' असे फलक झळकले होते.
अशा या मुळच्या अफगाणी क्रिकेटपटूला त्यांच्या मायदेशाच्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याच्या शुभारंभाला बीसीसीआयने सन्मानाने आमंत्रित केले होते. त्यामुळे त्यांच्या मूळ अफगाणी असण्याच्या आठवणी जाग्या झाल्या.