Asia Cup 2022, BAN vs AFG: बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात सनसनाटी विजय मिळवत अफगाणिस्तानच्या संघाने स्पर्धेतील पुढच्या फेरीत धडक मारली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १२७ धावा केल्या. नजीब उर रहमान आणि राशिद खान यांच्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेश फलंदाज चांगलेच अडकले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनाही काही काळ संघर्ष करावा लागला, पण अखेरच्या टप्प्यात नजीबुल्लाह आणि इब्राहिम झादरान या जोडीने संघाला विजय मिळवून दिला. यंदाच्या हंगामात Super-4 मध्ये पोहोचणारा अफगाणिस्तान हा पहिलाच संघ ठरला.
बांगलादेशकडून नईम आणि अनामूल हे दोघे सलामीला उतरले. नईमने एका चौकार मारून चांगली सुरूवात मिळवून दिली. पण त्यानंतर नजीब उर रहमानच्या गोलंदाजीने बांगलादेशची पळता भूई थोडी झाली. पॉवर प्ले च्या षटकांत नजीबने ९ धावांत ३ बळी घेतली. आधी नईमला त्रिफळाचीत केले, त्यानंतर अनामूलला पायचीत तर कर्णधार शाकिब अल हसनची दांडी गुल केली. नजीबच्या फिरकीनंतर राशिद खानने आपल्या फिरकीची जादू दाखवली. मुश्फीकूर रहीम, अफीफ होसेन आणि महमदुल्ला या तिघांना त्याने माघारी धाडले. महमदुल्लाने २५ धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात मोसाद्दक होसेनने ३१ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला २० षटकात १२७ धावा करता आल्या.
१२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हजरतुल्ला झझाईने २३ धावांची खेळी केली. रहमानुल्ला गुरबाजही ११ धावांत माघारी परतला. कर्णधार मोहम्मद नबीलाही ८ धावांवर तंबूत परतावे लागले. पण त्यानंतर इब्राहिम झादरानने ४१ चेंडूत नाबाद ४२ तर नजीबुल्लाह झादरानने १७ चेंडूत धडाकेबाज नाबाद ४३ धावा कुटल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.