मागील काही कालावधीपासून अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने असामान्य कामगिरी केली. वन डे विश्वचषक असो की मग ट्वेंटी-२० विश्वचषक... अफगाणिस्तानने पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारली. अलीकडेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा वन डे मालिकेत पराभव केला. भारतात झालेल्या वन डे विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तान आणि इंग्लंडला पराभूत केले होते. तेव्हा त्यांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल असे वाटत असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या तोंडचा घास गेला. मोठा अपसेट करण्यापासून अफगाणिस्तान थोडा दूर राहिला. त्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. याच विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा पुढील प्रवास सुरू राहिला आणि त्यांनी अंतिम सामन्यात यजमान भारताला नमवून विश्वचषक उंचावला.
वन डे विश्वचषकात अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि इंग्लंडचा पराभव करुन हम किसी से कम नही हे दाखवून दिले. भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जडेजा अफगाणिस्तानच्या खेळाडूंना धडे देताना दिसला. अफगाणिस्तानच्या या यशात सपोर्ट स्टाफमधील सदस्य असलेल्या जडेजाचा मोठा हात आहे. त्याने प्रशिक्षक म्हणून अफगाणिस्तानच्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले. आता याबद्दल बोलताना अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने एक मोठा खुलासा केला.
अफगाणिस्तानच्या कर्णधाराचा खुलासा अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदीने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टवर बोलताना विविध बांबीवर प्रकाश टाकला. आमच्या कठीण काळात अजय जडेजाने नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. आमचा पराभव झाल्यानंतर तो आमचा उत्साह वाढवण्यासाठी मार्गदर्शन करत असे. जेव्हा वन डे विश्वचषकाची स्पर्धा संपली तेव्हा अजय जडेजाच्या डोळ्यात आमच्या देशासाठी अश्रू होते. त्याचे आमच्यावर असलेले प्रेम यातून दिसते. माझ्याकडे त्या क्षणाचा व्हिडीओ देखील आहे, असे शाहिदीने नमूद केले.
अजय जडेजासोबतच्या एका संवादाबद्दल भाष्य करताना शाहिदीने सांगितले की, मी जडेजाला तुझ्याकडून खूप काही शिकलो असल्याचे आवर्जुन सांगितले. पण, त्याने मला माझे वाक्य पूर्ण होऊ दिले नाही... तो म्हणाला की, हे तू काय बोलत आहेस? मीच तुम्हा सर्वांकडून खूप काही शिकलो शिकत आहे. आपण नेहमीच एकमेकांच्या संपर्कात राहू.