अफगाणिस्तानचा कर्णधार हजमतुल्लाह शाहिदीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सेमीफायनलिस्ट सांगताना पाकिस्तानला वगळले. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार, पुढच्या वर्षी होणारी ही स्पर्धा पाकिस्तानच्या धरतीवर खेळवली जाणार आहे. मात्र, भारतीय संघ तिकडे जाणार का यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. मागील काही घटना पाहता बीसीसीआय टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी करू शकते. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केल्याचे दिसते. पाकिस्तानातील कराची येथे क्रिकेट स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
मागील काही कालावधीपासून अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने असामान्य कामगिरी केली. वन डे विश्वचषक असो की मग ट्वेंटी-२० विश्वचषक... अफगाणिस्तानने पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारली. अलीकडेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा वन डे मालिकेत पराभव केला. भारतात झालेल्या वन डे विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तान आणि इंग्लंडला पराभूत केले होते.
अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदीने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टवर बोलताना विविध बांबीवर प्रकाश टाकला. यावेळी त्याला ICC Champions Trophy 2025 चे सेमीफायनलिस्ट कोण असतील याबद्दल विचारले असता आपल्या संघाचा आत्मविश्वास सांगितला. तो म्हणाला की, अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठेल हे निश्चित आहे. याशिवाय भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत दिसतील असे मला वाटते. एकूणच अफगाणिस्तानच्या कर्णधाराने यजमान पाकिस्तानचे नाव घेतले नाही.
तसेच आमच्या कठीण काळात अजय जडेजाने नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. आमचा पराभव झाल्यानंतर तो आमचा उत्साह वाढवण्यासाठी मार्गदर्शन करत असे. जेव्हा वन डे विश्वचषकाची स्पर्धा संपली तेव्हा अजय जडेजाच्या डोळ्यात आमच्या देशासाठी अश्रू होते. त्याचे आमच्यावर असलेले प्रेम यातून दिसते. माझ्याकडे त्या क्षणाचा व्हिडीओ देखील आहे, असेही शाहिदीने नमूद केले.
Web Title: Afghanistan, India, Australia and England this four teams Hashmatullah Shahidi picks his semifinalists for 2025 Champions Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.