Mohammad Nabi ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी वन डे अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी वन डे अष्टपैलूंच्या क्रमवारीत बांगलादेशच्या शाकिब अल हसनचे वर्चस्व होते. शाकीबची आता एका स्थानाने घसरण झाली असून तो दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. नबीबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच त्याने श्रीलंकेविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. अफगाणिस्तानचा या सामन्यात पराभव झाला असला तरी नबीच्या शतकाने सामन्यात रंगत आली होती.
सध्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीला खेळला गेला. या सामन्यात नबीने शानदार फलंदाजी केली. त्याने १३० चेंडूंचा सामना करत १३६ धावा केल्या. नबीच्या या खेळीत १५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या उत्कृष्ट कामगिरीचा नबीला आयसीसी क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे. खरं तर तो वन डेमधील अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे.
३९ व्या वर्षी ऐतिहासिक भरारी
वन डेतील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बांगलादेशचा दिग्गज शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर होता. पण आता शाकिबची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. शाकिबला ३१० रेटिंग मिळाले आहे, तर नबीने ३१४ रेटिंहसह पहिला क्रमांक पटकावला. या यादीत झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याला २८८ रेटिंग मिळाले आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा १० व्या स्थानावर आहे. ३९ व्या वर्षी नबीने आयसीसी क्रमवारीत गरूडझेप घेतली.
मोहब्बद नबीच्या वन डे कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १५८ सामन्यांमध्ये ३३४५ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने दोन शतकांसह १६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची वन डेतील सर्वोत्तम धावसंख्या १३६ धावा राहिली. नबीने या फॉरमॅटमध्ये १६३ बळी घेतले आहेत.
Web Title: Afghanistan Mohammad Nabi is claimed the No.1 spot on the latest ICC Men's ODI All-Rounder Rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.