ढाका : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने ट्वेंटी-20 तिरंगी मालिकेत विजयी धडाका कायम राखताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने यजमान बांगलादेशवर 25 धावांनी विजय मिळवला. मोहम्मद नबीची वादळी खेळी आणि मुजीब उर रहमानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला. या विजयाची नोंद करून अफगाणिस्तानने गुणतालिकेत 4 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. शिवाय एका वर्ल्ड रेकॉर्डलाही गवसणी घातली आहे. अफगाणिस्तानने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये केलेल्या या वर्ल्ड रेकॉर्डच्या आसपासही टीम इंडिया नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचे चार फलंदाज अवघ्या 32 धावांत माघारी परतले. महमुदुल्लाह ( 44) वगळता अन्य खेळाडूंनी निराश केले. रहमनाच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांचे काहीच चालले नाही. रहमानने 15 धावांत 4 विकेट्स घेतल्या. त्याला फारीद अहमद ( 2/33), रशिद खान ( 2/23) आणि गुलबदीन नैब ( 2/27) यांची सुरेख साथ मिळाली.
या विजयासह अफगाणिस्तानने सलग 12 ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांनी स्वतःच्याच नावे असलेला 11 विजयांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. यासह आशियात त्यांनी खेळलेले मागील सर्वच्या सर्व 21 सामने जिंकले आहेत. सलग सर्वाधिक ट्वेंटी-20 विजय मिळवणाऱ्या अव्वल पाच संघांत अफगाणिस्तान ( 12), अफगाणिस्तान (11), पाकिस्तान ( 9), इंग्लंड ( 8), आयर्लंड ( 8) आणि पाकिस्तान ( 8) यांचा क्रमांक येतो.