अफगाणिस्तानचा सुपर स्टार क्रिकेटपटू राशिद खान हा जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये आपला दम दाखवत आहे. सध्या तो इंग्लंडच्या दी हंड्रेड ( The Hundred) लीगमध्ये खेळत आहे. पण, नेहमीप्रमाणे तो त्याच्या कामगिरीमुळे नाही, तर एका कृतीमुळे चर्चेत आला आहे. अफगाणिस्तानात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, राशिदसह अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंची कुटुंबीय देशात अडकले आहेत. तालिबानींनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. अशात राशिदनं देशाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी चेहऱ्यावर अफगाणिस्तानच्या झेंड्याचे चित्र रेखाटले अन् मैदानावर उतरला.
२० ऑगस्टला दी हंड्रेड लिगमध्ये ट्रेंट रॉकेट्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा राशिद साऊदर्न ब्रेव्हविरुद्ध चेहऱ्यावर देशाच्या झेंड्याचे चित्र रेखाटून मैदानावर आला. साऊदर्न ब्रेव्ह संघानं हा सामना ३२ चेंडू व ७ विकेट्स राखून सहज जिंकला. ट्रेंट रॉकेट्सचा संपूर्ण संघ ९१ चेंडूंत ९६ धावांत माघारी परतला. राशिदला या सामन्यात फार कमाल करता आली नाही. त्यानं १५ चेंडूंत २६ धावा दिल्या. फलंदाजीतही त्याला दोन धावा करता आल्या.