नवी दिल्ली : ट्वेंटी-20 विश्वचषक 2022 मधील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर अनेक दिग्गजांनी संघावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी तर हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्याची मागणी केली आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप या बाबतीत कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. मात्र जगभरातील दिग्गजांनी हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला आहे. अशातच अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने पांड्याने ज्या प्रकारे कर्णधारपद सांभाळले आहे यावरून कौतुक केले आहे. हार्दिक भारतीय संघाचा कर्णधार होण्यास पात्र असल्याचे राशिद खानने म्हटले आहे.
राशिद खानने वृत्तसंस्था एएनआयशी संवाद साधताना म्हटले, खेळाडूंना मॅनेज करणे कठीण असते आणि पांड्याला ते चांगल्या पद्धतीने समजते. तो दबावात शांत आणि स्थिर राहतो. सर्वांना असाच कर्णधार हवा असतो. हार्दिक भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे आणि तो एक यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध करू शकतो. "मी पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. एक खेळाडू म्हणून मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे", अशा शब्दांत राशिदने पांड्याचे कौतुक केले. राशिद खान आयपीएल 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. संघाने पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफीवर कब्जा केला.
न्यूझीलंडमध्ये जिंकली मालिकाहार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने अलीकडेच न्यूझीलंडच्या धरतीवर ट्वेंटी-20 मालिका जिंकली. भारताने ही मालिका 1-0 अशी आपल्या नावे केली. पुढील वर्षी वनडे विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदातही फेरबदल होण्याची पूर्ण शक्यता आहे. पुढील ट्वेंटी-20 विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"