नवी दिल्ली - संपूर्ण जग शांत राहून बघत राहिली अन् अफगाणिस्तान(Afghanistan) पूर्णत: तालिबानच्या हाती गेलं. १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतात स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता तेव्हा तालिबानचे सैनिक काबुल ताब्यात घेत होते. अफगाणिस्तानात सध्या तणावाची परिस्थिती बनली आहे. त्यावरुन क्रिकेटर राशिद खान(Rashid Khan) खूप चिंतेत आहेत. राशिद त्याच्या कुटुंबाला देशाबाहेर काढण्यास सक्षम नाही असं इंग्लंडचे माजी कॅप्टन केविन पीटरसन म्हणाला आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, सध्या काबुल येथील हामिद करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरील परिस्थितीत चिघळली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. राशिद यावेळी यूकेमध्ये आहे. जिथे द हंड्रेड लीगमध्ये ट्रेंट रॉकेट्स(Trent Rockets) यांच्याकडून तो खेळत आहे.
आम्हाला मरण्यासाठी सोडू नका....राशिदनं जगभरातील नेत्यांना केलं आवाहन
काही दिवसांपूर्वी राशिदने अफगाणिस्तानमध्ये वाढणाऱ्या तालिबान कृत्याला पाहून ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील नेत्यांना अफगानी लोकांना वाचवण्यासाठी आवाहन केले होते. प्रसिद्ध मिस्ट्री स्पिनर्समध्ये ओळख असलेल्या राशिद खानने ट्विट केले की, जगभरातील प्रिय नेते, आमचा देश संकटात आहे. दरदिवशी महिला आणि मुलांसह हजारो लोक मारले जात आहेत. घरं आणि संपत्तीचं नुकसान होत आहे. लोकं त्यांचं घर सोडून पळण्यासाठी मजबूर आहेत. या कठिण परिस्थितीत आम्हाला एकटं सोडू नका. अफगाणिस्तान आणि येथील लोकांना वाचवा, आम्हाला शांती हवी असं त्याने सांगितले.
मागील २० वर्षापासून तालिबानचा अफगाणिस्तानशी संघर्ष
२००१ पासून तालिबान अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तानशी लढाई करतोय. अफगाणिस्तानात तालिबानचा उदयही अमेरिकेच्या प्रभावामुळे झाला. आता तालिबान अमेरिकेसाठी मोठे डोकेदुखी बनला आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघाने अफगाणिस्तानात फौज उतरवली होती. तेव्हा अमेरिकेने स्थानिक मुजाहिद्दीनला हत्यारं आणि ट्रेनिंग देऊन प्रोत्साहन दिले होते. सोव्हियत संघाने हार पत्करली परंतु अफगाणिस्तानात एका कट्टर दहशतवादी संघटना तालिबानचा उदय झाला.
सोव्हिएत संघाच्या फौजा अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या कंदहार शहराला आपले पहिले केंद्र बनवले. तालिबानने २० वर्षानंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये कधीकाळी सोव्हिएत संघाच्या फौजा होत्या. यांविरोधात लढणाऱ्या कट्टरतावाद्यांचा कंमाडर मुल्ला मोहम्मद उमर यांने पुढे तालिबानची स्थापना केली.