AFG vs NZ Test in India: अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या भारतात आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा कसोटी सामना ९ ते १३ सप्टेंबर दरम्यान ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक स्टेडियमवर खेळवला जात आहे. मात्र सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा खेळावर बराच परिणाम दिसून आला. ओल्या आउटफिल्डमुळे खेळ सुरू होऊ शकला नाही. सामन्याचा पहिला दिवस एकही चेंडू न टाकता वाया गेला. यामुळेच, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी स्टेडियममधील गैरसोयींबद्दल नाराजी व्यक्त केली.
अफगाणिस्तानचा संघ आपले यजमानपदाचे सामने फक्त भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळतात. हा संघ भारतातील ग्रेटर नोएडा, लखनौ आणि डेहराडून अशा तीन ठिकाणी घरचे सामने खेळतो.
'ग्रेटर नोएडामध्ये कधीच सामने खेळायला येणार नाही'
बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांचा संघ या स्टेडियमच्या व्यवस्थेवर अजिबात खूश नाही आणि ते पुन्हा या स्टेडियममध्ये येणार नाहीत. त्याने सांगितले की, अफगाणिस्तानचे खेळाडू येथे जेवणापासून ते प्रशिक्षण सुविधांपर्यंत कोणत्याही गोष्टीवर खूश नाहीत. शहीद विजय सिंह पथिक स्टेडियममध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. आम्ही येथे पुन्हा कधीच खेळणार नाही, लखनौला आमचे प्राधान्य असेल. येथे मूलभूत सुविधा नाहीत. हे स्टेडियम अयोग्य पद्धतीने ठेवण्यात आले आहे.
अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनेही चांगली आऊटफिल्ड मिळावी अशी आशाही व्यक्त केली. चांगल्या सोयी मिळतील तेथे राहू, असेही तो म्हणाला. भारत हे आमचे घर आहे. आशा आहे की आम्हाला भारतात चांगल्या सोयी मिळतील आणि आम्ही तिथेच राहू. मला वाटते की आपण एकाच ठिकाणी टिकून राहिलो तर ते आपल्यासाठी अधिक प्रभावी होईल.