Afghanistan vs New Zealand Test Series : न्यूझीलंडचा क्रिकेट संघ मोठ्या कालावधीनंतर भारत दौऱ्यावर आला आहे. गुरुवारी सकाळी किवी संघ भारतात दाखल झाला. पण, न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध खेळणार नाही. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एकमेव कसोटी सामना होणार आहे. अफगाणिस्तानचा संघ आधीच भारतात आला असून आता न्यूझीलंडच्या आगमनाने सामन्याच्या तयारीला आणखी वेग आला आहे. नोएडा येथे ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नोएडा हे अफगाणिस्तानच्या संघाचे होम ग्राउंड बनले आहे.
या कसोटी सामन्यासाठी टीम साऊदी न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व करत आहे. किवी संघात केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि मिशेल सँटनर यांचाही समावेश आहे. जरी कसोटी सामना अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असला तरी हा सामना ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार नाही. त्यामुळे या सामन्यातील विजय किंवा पराभवाचा WTC च्या क्रमवारीवर कोणताही परिणाम होणार नाही. अफगाणिस्तानच्या संघाने यापूर्वी देखील नोएडा येथे सामना खेळला आहे, ज्यामध्ये संघाच्या खेळाडूंची कामगिरी चांगली दिसली होती. यावेळी संघाची कमान हशमतुल्ला शाहिदीच्या हाती आहे. मात्र संघाचा स्टार खेळाडू राशिद खान सामन्यातून बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला.
न्यूझीलंडचा संघ -टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओरुर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, केन विल्यमसन, विल यंग.