Rahmat Shah Most Bizarre Run Out Video : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना एकतर्फी झाला. पहिल्या दोन सामन्यात वर्चस्व गाजवणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला रोखत दक्षिण आफ्रिकेनं मोठी नामुष्की टाळली. २ सामन्यातील दिमाखात विजयासह मालिका खिशात घालणाऱ्या अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात अवघ्या १६९ धावांत आटोपला होता. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३३ ओव्हरमध्येच खेळ खल्लास केला.
रन आउटची ही विकेट म्हणजे "मोयो मोयो" सीन
पहिल्यांदा बॅटिंग करताना सलामीवीर गुरबाझच्या ९४ चेंडूतील ८९ धावांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. अफगाणिस्तानच्या ताफ्यातील एका फलंदाजाने तर आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचा सीनही पाहायला मिळाला. रहमत शाह (Rahmat Shah) डावातील नवव्या षटकात अजब गजब प्रकारे रन आउट झाला. क्रिकेटच्या मैदानातील रन आउटची ही विकेट म्हणजे फलंदाजावर "मोयो मोयो" सीन ओढावल्याचा क्षण दाखवणारी अशी होती. लुंगी एनिगडीचा प्रयत्न फसला, पण तरीही फलंदाज जाळ्यात अडकला
दक्षिण आफ्रिकेकडून जलदगती गोलंदाज लुंगी एनगिडी हा ९ वे षटक टाकत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर रहमतुल्लाह गुरबाझ याने सरळ गोलंदाजाच्या दिशेनं फटका मारला. एनिगडीनं खूप प्रयत्न करुनही चेंडू काही त्याची हाती स्थिरावला नाही. त्याचा प्रयत्न अपयशी ठरला पण त्यातही नॉन स्ट्राइकर असलेला रहमत शाह मात्र चांगलाच फसला.
नेमकं काय घडलं?
अफगाणिस्तानच्या फलंदाजाला रन आउटच्या रुपात आपली विकेट गमवावी लागली. कारण एननिगडीच्या हातून निसटलेला चेंडू धाव घेण्यासाठी क्रिज सोडलेल्या रहमत शाहच्या खांद्याला लागला अन् तो त्याच वेगानं स्टंपवर आदळला. ६ चेंडूत फक्त १ धाव करून अफगाणिस्तानच्या या फलंदाजावर तंबूत परतण्याची वेळ आली. त्यानेच अनावधानाने आपल्या विकेटचं जाळं विणलं. हा सीन क्रिकेटच्या इतिहासातील अजब गजब रन आउट पैकी एक आहे.
गुरबाझती ८९ धावांची खेळी ठरली व्यर्थ
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या या सामन्यात गुरबाझनं ९४ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय अल्लाह मोहम्मद गझनफर (Allah Ghazanfar) याने १५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ३१ धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाने १६९ धावांपर्यंत मजल मारली होती. लुंगी एनिगिडीनं या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेनं हे अल्प आव्हान ३३ षटकात पार करत शेवटचा एकदिवसीय सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करम याने ६७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ६९ धावांची सर्वोच्च खेळी केली.