मुंबई: क्रिकेटच्या जगातील भीष्म पितामह अशी ओळख असलेले सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर क्रिकेटच्या इतक्या विक्रमांची नोंद आहे की एखादा मोजून थकेल. पण क्रिकेटप्रेमींच्या तोंडावर त्यांचा एक विक्रम नेहमी असतो, तो म्हणजे त्यांची 52 कसोटी सामन्यांतील 99.94 ची अविश्वसनिय सरासरी.
खेळाच्या मैदानात कोणताही विक्रम सुरक्षित नसतो असं म्हटलं जातं, त्याचंच एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळालेल्या अफगाणिस्तानचा बहीर शाह हा तरूण खेळाडू सध्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमांना टक्कर देत आहे. आयसीसीने स्वतःच याबाबत 'घोषणा' केली आहे.
सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत 234 प्रथम श्रेणी सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्यांनी 95.14 च्या सरासरीने तब्बल 117 शतक ठोकले. पण अफगाणिस्तानच्या बहीर शाह या खेळाडूने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये असा काही कारनामा करून दाखवला आहे की जो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही. फर्स्ट क्लास अर्थात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कमीतकमी 1 हजार धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची सरासरी आहे 121.77 ची. महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आजपर्यंत हा विक्रम होता परंतु शाहने तो आता आपल्या नावावर केला आहे. ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 121.77 च्या सरासरीने 28,067 धावा केल्या होत्या तर बहीर शाहने 7 सामन्यात 121.77 च्या सरासरीने 1096 धावा केल्या आहेत. बहीर शाह सध्या अंडर 19 च्या विश्वचषकात खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये सराव करत आहे. यापूर्वीत्याच्या पहिल्याच फर्स्ट क्लास सामन्यात शाहने नाबाद २५६ धावांची खेळी केली होती. त्यावेळी कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला होता. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला होता.