पाकिस्तानच्या कामरान अकमल याच्यानंतर आणखी एका खेळाडूवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. अकमलवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आता अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक शफिकउल्लाह शफिक याने भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहा वर्षांची बंदी घालण्यात आली. 30 वर्षीय शफिकनं अफगाणिस्तान प्रीमिअर लीगच्या ( 2018) पहिल्या मोसमात संशयास्पद हालचाली केल्या. शिवाय त्यानं बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहीत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये सिलहत थंडर संघाकडून त्यानं तीन सामन्यांत 18 धावा केल्या. नांघरहर येथील शफिकनं त्याच्यावर लावलेल्या चार आरोप कबूल केले आहेत. 2.1.1 कलमांतर्गत त्याच्यावर मॅच फिक्सिंग किंवा इतरांना त्यासाठी प्रोसाहन करण्याचा आरोप ठेवल्यात आला आहे. 2.1.3कलमांतर्गत त्याच्यावर लाच घेण्याचा आरोपही आहे. याशिवाय तो 2.1.4 आणि 2.4.4 कलमांतर्गत दोषी आढळला आहे. ''क्रिकेटमध्ये बेकायदेशीर कृत्य करण्याचा डोक्यात विचार सुरू असलेल्या खेळाडूंसाठी हा धोक्याचा इशारा आहे,''असे मत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे भ्रष्टाचारी विरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी सय्यद अन्वर शाह कुरैशी यांनी व्यक्त केलं.