नवी दिल्ली : अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. आपल्या तिसऱ्याच कसोटी सामन्यात त्यांनी बांगलादेशवर विजय मिळवला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळणाऱ्या संघावर मिळवलेला हा अफगाणिस्तानचा पहिला विजय आहे. कारण यापूर्वी अफगाणिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवला होता. पण पहिल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.
अफगाणिस्तानच्या संघाला यापूर्वी काही जणं कच्चा लिंबू समजत होते. पण त्यांनी बांगलादेशसारख्या संघाला पराभूत करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. या पराभवानंतर आम्ही छोटे मियाँ राहिलो नाही, असेच अफगाणिस्तानतचे चाहते बांगलादेशवासियांना म्हणत असतील.
या विजयात अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खानने मोलाचा वाटा उचलला. रशिद हा सर्वात युवा कर्णधार ठरला होता. अफगाणिस्तानने बांगलादेशपुढे विजयासाठी 398 धावांचे आव्हान ठेवले होते. पण रशिदने सहा विकेट्स मिळवत बांगलादेशचे कंबरडे मोडले. त्यामुळेच बांगलादेशचा डाव 173 धावांवर आटोपला आणि अफगाणिस्तानने 224 धावांनी दणदणीत विजय मिळवला.