भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून चर्चेत आलेल्या 140 किलो वजनाच्या आणि 6.5 फुटाच्या रहकिम कोर्नोवॉलनं बुधवारी आपल्या फिरकीच्या तालावर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना नाचवलं. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकमेव कसोटी सामना भारतात लखनौ येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या रहकिमनं आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्यानं आपल्या फिरकीच्या तालावर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना नाचवलं आणि त्यानं दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
कसोटीत पदार्पण करताना रहकिमनं भारताच्या चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना बाद केलं होतं. आज त्यानं कारकिर्दीतल्या दुसऱ्या सामन्यात सहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं पहिल्या डावात 75 धावांत 7 विकेट्स घेतल्या. रहकिमची ही कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. अफगाणिस्तानचा पहिला डाव 187 धावांत गुंडाळण्यात विंडीजला यश आलं. भारतीय खेळपट्टींवर विंडीजच्या गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी 1975मध्ये सर अँडी रोबर्ट्स यांनी 64 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. तर 1975लाच लान्स गिब्स यांनी वानखेडे स्टेडियमवर 98 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या.
अफगाणिस्तानच्या पहिल्या डावाच्या उत्तरात वेस्ट इंडिजला 277 धावाच करता आल्या. शामार्ह ब्रुक्सनं 111 धावांची खेळी केली. त्याला जॉन कॅम्प्बेल ( 55) आणि शेन डॉवरीच ( 42) यांची उत्तम साथ लाभली. अफगाणिस्तानच्या आमीर हम्झानं 74 धावांत 5 विकेट्स घेतल्या, तर रशीद खाननं 114 धावांत 3 विकेट्स घेतल्या. झहीर खाननं दोन बळी बाद केले. दुसऱ्या डावातही अफगाणिस्ताची घसरण सुरूच राहिली. त्यांचे 7 फलंदाज 109 धावांत माघारी परतले. या डावात कोर्नवॉल ( 3/41) आणि रोस्टन चेस ( 3/10) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. या तीन विकेटनं कोर्नवॉलच्या नावावर विक्रमाची नोंद झाली. उपखंडात एकाच कसोटीत दहा विकेट्स घेणारा तो वेस्ट इंडिजचा पहिलाच फिरकीपटू ठरला.