-अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)
भारताने टी-२० मालिकाही जिंकली. जबरदस्त आणि शानदार प्रदर्शन. कारण कुठेतरी असे वाटत होते की, दुसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिका आपल्या लयीत आली असेल. त्यांचे दिग्गज फलंदाज हाशिम आमला, एबी डिव्हिलीयर्स हे खेळत नव्हते तरी सुद्धा आफ्रिकेने मोठे धाडस दाखविले, परंतु तिसरा व अत्यंत चुरशीचा सामना जिंकत भारताने कमाल केली. वन डे मालिका ५-१ ने आणि नंतर टी-२० मालिका जी एकप्रकारे ‘लॉटरी’ समजली जाते ती २-१ ने जिंकली. दोन्ही मालिका जिंकत भारताने आपला दौरा यशस्वी ठरला. स्पर्धेत खूप चांगले ‘परफॉर्मन्सही आलेत. भुवनेश्वर कुमार जो सामनावीर ठरला. शिखर धवन ज्याने खूप धावा केल्या. सुरेश रैना, ज्याने उत्तम पुनरागमन केले. एकंदरीत विचार केला तर भारताने हा दौरा यशस्वी ठरवला. कसोटी मालिका गमावण्याचे दु:ख हे विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना झाले असेल. कारण ती मालिकाही जिंकण्याची संधी भारताला होती. असे असले, तरी विदेशी भूमीवर या संघाने केलेल्या कामगिरीच्या विचार केला, तर हा दौरा यशस्वी असा आहे. निश्चितच, या दौºयातून खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असेल.दौ-याचे हीरो कोण असतील? तर याचे उत्तर सर्वात पुढे येते ते म्हणजे विराट कोहली. एक कर्णधार म्हणून, फलंदाज म्हणूनही. त्याने खूप धावा केल्या त्या सुद्धा सर्वच फॉर्मेटमध्ये. जगातला सर्वाेत्कृष्ट फलंदाज म्हणून तर या मालिकेत त्याने स्टीव्ह स्मिथलाही मागे टाकले आहे. वन डे क्रिकेटमध्ये तर तो आहेच. याशिवाय सर्वात मोठी प्रगती केली ती भुवनेश्वर कुमार याने. त्याची ही प्रगती भारतीय टीमला पुढे साथ देईल. फलंदाज म्हणूनही त्याने योगदान दिले. त्यानंतर नंबर येतो तो जसप्रीत बुमराह याचा, ज्याने उत्कृष्ट पदार्पण केले. बुमराह हा लवकरच शिकतो. याशिवाय युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या उभरत्या ता-यांनी भारतीय गोलंदाजीची शान वाढविली. चहल थोडा महागडा ठरला, पण जेपी ड्युमिनी, ड्युप्लेसीस आणि हाशिम आमला यांच्यावर वर्चस्व राखण्यात तो यशस्वी ठरला. एकंदरीत, भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट ठरली.
काही खेळाडूंनी केले निराश-काही खेळाडूंनी केलेल्या निराशेकडे व्यवस्थापनाला लक्ष द्यावे लागेल. रोहित शर्मा, मुरली विजय, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा हे अपयशी ठरले. आता पुढे विदेशी भूमीवर खेळायचे असेल तर सातत्य गरजेचे आहे.आगामी आॅस्ट्रेलिया, इंग्लंड दौ-यंसाठी याचा विचार करावा लागणार आहे. कारण, आपण कुठल्यातरी एका फलंदाज किंवा एका गोलंदाजावर अवलंबून राहून चालणार नाही.महेंद्रसिंग धोनीने यष्टिरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली; पण फलंदाज म्हणून तो चांगले योगदान देऊ शकला नाही. खेळाडूंमध्ये सातत्य असेल तर संघाची कामगिरी सुधारते. आगामी विश्वचषक जिंकायचा असेल तर प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरेल.