अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेतील दुष्काळ संपुष्टात आणला. अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या कॅचवर मॅच फिरली होती. क्रिकेटच्या इतिहासातील हा एक सर्वोत्तम कॅच होता. पण त्यावरून वादही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरनं केली सूर्याची थट्टा
टी २० वर्ल्ड कप स्पर्धा होऊन दोन महिने उलटल्यावरही सोशल मीडियावर या कॅचसंदर्भात फनी अंदाजात काही व्हिडिओ मीम्स व्हायरल होताना दिसते. आता दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शम्सी याने सूर्याच्या कॅचची थट्टा केल्याचा सीन सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याची ही गोष्ट भारतीय चाहत्यांना चांगलीच खटकली असून त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरची शाळा घेतली आहे.
नेमकं काय घडलं?
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवनं सीमारेषेवर डेविड मिलरचा अफलातून झेल टिपला होता. तो झेल होतो की षटकार यावरुनही चर्चा झाली. निकाल भारताच्या बाजूनं झाला अन् टीम इंडियाने वर्ल्ड कपही घरी आणला. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटनं या धाटणीच्या गावठी अंदाजातील मजेशीर व्हिडिओवर एक कमेंट केलीये. जर वर्ल्ड कप वेळी हे तंत्र अवलंबले असते तर तो बॅटर नॉट आउट असता, अशा आशयाची कमेंट दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरनं केली. यावर अनेक क्रिकेट चाहत्या त्याला ट्रोल करताना दिसले.
चाहते भडकल्यावर असं दिल स्पष्टीकरण
सोशल मीडियावर चाहते राग व्यक्त करताना दिसल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरनं यावर स्पष्टीकरण देणारी पोस्टही केलीये. ती कमेंट मजेशीर अंदाजात केली होती, असे तो म्हणाला आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत आयसीसी स्पर्धेतील दुष्काळ संपवला होता. २०१३ नंतर भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.