Afro Asia Cup Virat Kohli Babar Azam May Be teammates as popular series : क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना असला की, तो मोठ्या उत्सुकतेचा विषय ठरतो. आता दोन्ही संघातील खेळाडू एकत्र खेळताना दिसू शकतात. १७ वर्षांपूर्वीची जुनी स्पर्धा पुन्हा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली आणि पाकिस्तानी बॅटर बाबर आझम हे दोघे एकत्र खेळताना पाहण्याची संधी मिळू शकते.
...तर विराट-बाबर एकत्र उतरतील मैदानात
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आफ्रिका क्रिकेट असोसिएशननं (ACA) वार्षिक सर्वसाधारण सभेत सहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीकडे असोसिएशन पुनर्रचनेसह आफ्रिकेतील खेळाडूंसाठी स्पर्धात्मक संधी निर्माण करण्याच्या दृष्टिने नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. याचाच एक भाग म्हणून १७ वर्षांनी पुन्हा एकदा Afro Asia Cup स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार सुरु आहे. तिसरा हंगाम खास करण्यासाठी आयोजक भारत-पाकच्या स्टार खेळाडूंसह ही स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असेल. जर या स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी विराट कोहली आणि बाबर आझम राजी झाले तर हे दोन खेळाडू आशिया इलेव्हन या संघाकडून मैदानात उतरल्याचा खास सीन क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळू शकतो.
पहिला हंगाम आफ्रिकेत तर दुसरा हंगाम भारतात
आतापर्यंत दोन वेळा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २००५ मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. त्यानंतर २००७ मध्ये ही स्पर्धा भारतीय मैदानात खेळवण्यात आली होती. आता तिसऱ्या हंगामातील स्पर्धा केनियामध्ये आयोजित करण्याचा प्लान आखण्यात येत आहे. ३ सामन्यांच्या माध्यमातून आशिया इलेव्हन आणि आफ्रिका इलेव्हन यांच्यातून विजेता निवडला जातो.
याआधी एमएस धोनीसह सचिन शोएब अख्तरही खेळले आहेत एकत्र
बऱ्याच वर्षांपासून भारत -पाकिस्तान या दोन संघातील द्विपक्षीय मालिकेला ब्रेक लागला आहे. या परिस्थितीतही या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघातील खेळाडू एकाच संघाकडून खेळताना पाहायला मिळू शकते. २००५ मध्ये झालेल्या स्पर्धेत इंझमाम उल हक याच्या नेतृत्वाखालील आशियाई प्लेइंग इलेव्हनमध्ये राहुल द्रविड, आशिष नेहरा, अनिल कुंबळे या दिग्गजांनी सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले होते. २००७ च्या दुसऱ्या हंगामात महेंद्रसिंह धोनी, सौरव गांगुली, हरभजन सिंग, झहीर खान,युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबत पाकच्या ताफ्यातील मोहम्मद असिफ, मोहम्मद युसुफ आणि शोएब अख्तर ही मंडळी आशिया इलेव्हन संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.