नवी दिल्ली : मोठ्या कालावधीनंतर मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. आयपीएल २०२३ चा थरार संपल्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. टप्प्याटप्प्याने टीम इंडियातील शिलेदार आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना होत होते. आयपीएल 'चॅम्पियन' संघाचे खेळाडू अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा हे देखील लंडन येथे दाखल झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणेने विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत रहाणेने म्हटले, "१८-१९ महिन्यानंतर भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली याचा आनंद होत आहे. आयपीएल आणि त्या आधी देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम माझ्यासाठी चांगला राहिला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीनं मला स्वत:ला सिद्ध करण्याचं नवं व्यासपीठ मिळवून दिलं. हा खरंच एक भावनिक क्षण आहे, इथे येण्यासाठी मी माझ्या फिटनेसवर खूप काम केलं. माझी निवड केल्याबद्दल बीसीसीआय आणि निवडकर्त्यांचं आभार."
मागील गोष्टींचा विचार करत नाही - रहाणे
तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे. फलंदाज आणि गोलंदाजांसह सर्वांनीच सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मी १८ महिन्यांनी संघात पुनरागमन करत आहे पण मी याचा अर्थात मागील गोष्टींचा विचार करत नाही. मला इथपर्यंत पोहचण्यासाठी माझ्या कुटुंबीयांनी खूप मदत केली आणि त्यामुळे भारतासाठी खेळण्याचं माझं स्वप्न सत्यात उतरलं. मी आगामी काळात माझ्याकडून जे काही संघाला देता येईल त्यासाठी पुरेपुर प्रयत्न करेन अन् भारत आगामी सामन्यात चांगली कामगिरी करेल, असं रहाणेनं अधिक सांगितलं.
WTC फायनलसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू - यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
Web Title: After 18 months, Ajinkya Rahane has been included in the Indian squad for the World Test Championship final against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.