भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कर्णधार असल्याचं आता सिद्ध झालं आहे. गेल्या ६० कसोटी सामन्यांची तुलना केली गेल्यास कोहलीची कर्णधार म्हणून राहिलेली कामगिरी धोनीपेक्षा उत्कृष्ट ठरली आहे. अर्थात एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अजूनही धोनी अव्वल कर्णधार आहे. (After 60 Tests Virat Kohli better than MS Dhoni as captain)
नुकतंच भारताचा कसोटी संघ अजिंक्यपद कसोटी क्रिकेट सामन्यासाठी इंग्लंडला रवाना झाला. जागतिक कसोटी अजिंक्यपद पटकावण्यासाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जूनमध्ये लढत होणार आहे. याशिवाय इंग्लंडसोबत देखील कसोटी मालिका भारतीय संघ खेळणार आहे. कोहली आणि धोनी यांनी आतापर्यंत प्रत्येकी ६० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यात कोहलीची कामगिरी उत्तम ठरल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखालील ६० सामन्यांपैकी भारतीय संघानं ३६ सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २७ सामन्यांमध्ये विजय प्राप्त करता आला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं २०१८ साली ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून इतिहास रचला होता. याच विजयामुळे भारतीय संघाच्या आत्मविश्वासात वाढ झाली. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर गेल्या वर्षी भारतीय संघानं पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियात विजय साजरा केला होता.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध चार, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना जिंकला आहे. न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाला देखील सामोरं जावं लागलं होतं.