पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विविध बाबींवर प्रकाश टाकला. बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. फिक्सिंगमुळे अडचणीत सापडलेल्या मोहम्मद आमिरची पाकिस्तानी संघात एन्ट्री झाली असून यावर पीसीबी अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केला. (Mohammad Amir post) निवड समितीने हिरवा सिग्नल दिल्यास आमिर पाकिस्तानसाठी खेळू शकतो, असे नक्वी यांनी सांगितले.
मोहम्मद आमिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बोलकी पोस्ट केली. तो म्हणाला की, पाकिस्तानसाठी खेळायचं अद्याप माझं स्वप्न आहे. हे जीवन आपल्याला अशा मुद्द्यांवर आणते जिथे कधीकधी आपल्याला आपल्या निर्णयांवर पुनर्विचार करावा लागतो. मी आणि पीसीबी यांच्यात काही सकारात्मक चर्चा झाली आहे. मला आदरपूर्वक वाटले की, माझी गरज आहे आणि कुटुंबाशी चर्चा केल्यानंतरही मी पाकिस्तानसाठी खेळण्यास तयार आहे. मी आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी उपलब्ध आहे. मला सर्वकाही माझ्या देशासाठी करायचे आहे. हिरवी जर्सी घालणे आणि देशाची सेवा करणे ही माझी नेहमीच मोठी आकांक्षा राहिली आहे आणि राहील.
दरम्यान, शाहीन शाह आफ्रिदी भविष्यातही कर्णधार असेल याबाबत काहीही सांगता येत नाही. हारिस रौफला केंद्रीय करारात स्थान देण्यात आले आहे. नवीन प्रशिक्षक कोण असेल याबाबत ४-५ दिवसात स्पष्ट माहिती समोर येईल. तसेच निवड समितीने मोहम्मद आमिरला परत घेण्याबद्दल हिरवा सिग्नल दिला तर तो पाकिस्तानसाठी खेळू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ केवळ पाकिस्तानात खेळवली जाईल यात शंका नाही. हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा खेळवली जाणार नाही. महिलांची पाकिस्तान सुपर लीग खेळवण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा कर्णधार कोण असेल याबाबात निवड समिती निर्णय घेईल, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले.