मुंबई : क्रिकेट विश्वातील द्रोणाचार्य आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी निधन झाले. बुधवारी त्यांच्यावर दादरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आचरेकर सरांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले नाहीत, याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर अखेर महाराष्ट्र सरकारला उपरती झाली आहे. याप्रकरणी सारवासरव करण्यासाठी सरकारने आचरेकर सरांच्या कुटुंबियांशी बोलून काही कार्य करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
रमाकांत आचरेकर यांना आदरांजली देण्यासाठी सरकारच्यावतीने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. पण भाजपाचे हे दोघे मोठे नेते उपस्थित असताना आचरेकर सरांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात का करण्यात आले नाही, असा सवाल क्रीडाप्रेमी विचार होते. याप्रकरणाची दखल अखेर महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे.
याबद्दल तावडे म्हणाले की, " आचरेकर सर हे खऱ्या अर्थाने द्रोणाचार्य होते. त्यांनी घडवलेले बरेच खेळाडू भारतासाठीही खेळले. त्यांनी खेळाडूंच्या आयुष्यालाही चांगली शिस्त लावली. आचरेकर सरांना आदरांजली देण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यासाठी आम्ही सरांच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहे. आचरेकर सरांच्या नावाने एखादी संस्था किंवा उपक्रम राबण्याचा आमचा मानस आहे."
अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडवणाऱ्या आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का दिले नाहीत?, असा प्रश्न निर्माण झाला होता. आचरेकर यांच्या निधनानं एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. सरांनी अनेक क्रिकेटपटू घडवले. त्यांचं क्रिकेट प्रशिक्षणातील योगदान असामान्य आहे, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी सरांना आदरांजली वाहिली होती. मग असामान्य योगदान देणाऱ्या सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी का दिले नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात होता.