रॉबिन उथप्पा, सुरेश रैना यांनी नुकतीच भारतातील सर्व फॉर्माच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना IPL 2023 पूर्वी चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढवली. रैना CSKचा सदस्य नसला तरी त्या फ्रँचायझी करारबद्ध करेल असे वाटत होते. त्यात आता चेन्नई सुपर किंग्सच्या आणखी एका खेळाडूचा पराक्रम कानी पडतोय... वर्षभरात दुसऱ्यांदा त्यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. पण, याचा फटका CSK ला नव्हे तर त्याच्या राष्ट्रीय संघाला बसला आहे. आपण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याच्याबद्दल बोलतोय. पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या अलीने पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अलीने त्याचा निर्णय जाहीर केला आहे. २०१४मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अलीने ६४ कसोटीत २९१४ धावा व १९५ विकेट्स घेतल्या आहेत. ३५ वर्षीय अलीने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती, परंतु जूनमध्ये त्याने हा निर्णय मागे घेतला होता. पण, आता पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी त्याने पुन्हा निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. डिसेंबर महिन्यात रावळपिंडी, मुल्तान व कराची येथे या कसोटी खेळवल्या जाणार आहेत.
तो म्हणाला, मी यासंदर्भात बॅझशी प्रामाणिकपणे गप्पा मारल्या आणि मी स्वतःला महिनाभरासाठी हॉटेलच्या रुममध्ये अडकून पडलेलो पाहू शकत नाही. अशा परिस्थितीत मी क्षमतेनुसार खेळही करू शकत नाही. बॅझ ( ब्रेंडन मॅक्युलम) मला फोन केला आणि आम्ही दीर्घ वेळ एकमेकांशी बोललो. मी त्याला सॉरी म्हटले आणि त्याने मला समजून घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये शारीरिक कसोटी लागते आणि मी आता ३५ वर्षांचा आहे.
''मला क्रिकेटचा आस्वाद लुटायचा आहे आणि निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मला जर सर्वोत्तम देता येत नसेल, तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटसाठी कायमची दरवाजे बंद करण्याची हीच ती वेळ आहे. इंग्लंडसाठी ६४ कसोटी खेळणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही,''असेही त्याने म्हटले. मोइन अलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पाकिस्तानात ट्वेंटी-२० मालिका ४-३ अशी जिंकली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"