भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाच्या घोषणेदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा संतापल्याचे दिसले. खरं तर रोहितला भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी निर्माण झालेल्या क्रिकेट वर्तुळातील वातावरणाबद्दल विचारलं असता त्याने नाराजी व्यक्त केली.
रोहित म्हणाला की, अनेकदा मी सांगितलं आहे. बाहेर जे घडतं त्यानं मला काहीही फरक पडत नाही कारण आपले काम काही वेगळे असते. बाहेरचे वातावरण काय आहे हे जाणून घेणे किंवा वातावरणानुसार खेळणं आमचं काम नाही. संघात खेळणारे सर्व खेळाडू व्यावसायिक आहेत आणि त्यांनी या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. म्हणूनच मला वाटतं की, आम्हाला बाहेरील गोष्टींचा काही फरक पडत नाही. आगामी विश्वचषकात देखील पत्रकार परिषदेत, बाहेरील वातावरणाबद्दल काय वाटतं? असे प्रश्न विचारू नका. कारण मी उत्तर देणार नाही.
दरम्यान, आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान यजमान भारतासमोर असेल. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आगामी बहुचर्चित स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून संघात किरकोळ बदल करण्यात आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी स्पर्धेसाठी संघ जाहीर केला.
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू