shoaib akhtar on kamran akmal | नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष व्हायचे असल्याची इच्छा व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधले होते. अशातच अख्तरने पाकिस्तानी संघातील खेळाडूंना इंग्रजीवरून ट्रोल करण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर लाईव्ह टीव्ही शोमध्ये त्याचा सहकारी कामरान अकमलची खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमाच्या होस्टशी बोलत असलेल्या अख्तरने प्रथम कामरान अकमलचे कौतुक केले. तो म्हणाला, "कामी आमचा सामना विजेता आहे. तो हे ऐकत असेल. तो पाकिस्तानसाठी खरोखरच चांगला खेळला आहे." पण नंतर शोएबने इंग्रजीवरून अकमलची खिल्ली उडवली. कामरानच्या विधानाची खिल्ली उडवताना अख्तरने म्हटले, "मी ऐकत होतो, तो सक्रीन असे बोलत होता. पण ते सक्रीन नसून स्क्रीन आहे."
या आधी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तरने बाबर आझमने त्याच्या बोलण्याच्या कौशल्यावर काम न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बाबर हा देशातील सर्वात मोठा ब्रँड बनू शकतो, असे त्याला वाटते, मात्र इंग्रजी येत नसल्याने तो मागे राहिला असल्याचे अख्तरने सांगितले. तसेच गॅंगस्टर या चित्रपटात मला मुख्य भूमिका करण्याची ऑफर होती असा खुलासा अख्तरने केला.
शोएब अख्तरचा मोठा खुलासा "2005 मध्ये जेव्हा प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री मीराने मला सांगितले की, हिंदी चित्रपटांचे प्रख्यात दिग्दर्शक महेश भट मला भेटू इच्छित आहेत. मी कराचीत क्रिकेट शिबिरात गेलो होतो आणि ते चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आले होते. गँगस्टर या चित्रपटात मी भूमिका करावी अशी महेश भट यांची इच्छा होती. ही एक उत्तम स्क्रिप्ट होती आणि मी नेहमीच चित्रपटांचा आनंद लुटला आहे, पण काही कारणास्तव मी ही भूमिका स्वीकारली नाही", असे शोएब अख्तरने सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"