मुंबई : भारतीय संघात महिला ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेतून सुरू झालेला वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजला उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात बाकावर बसवण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आणि मितालीला न खेळवण्यावरून वाद सुरू झाला. मितालीनेही अबोला सोडताना प्रशिक्षक रमेश पोवार आणि माजी खेळाडू डायना एडल्जी यांच्यावर टीका केली. भारतीय क्रिकेय नियामक मंडळानेही पोवार यांची गच्छंती करताना प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले. पण, या वादामुळे संघातली फुट पडल्याचे दिसत आहे. प्रशिक्षकपदासाठी पोवार अर्ज करणार असल्याचे समजत आहे.
मिताली राज आणि रमेश पोवार या वादात महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी पोवार यांनाच पुन्हा कोच बनवा, अशी मागणी केली आहे. सीओए अध्यक्ष विनोद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमन आणि स्मृती यांनी पोवार यांना २०२१ पर्यंत कोच बनविण्याची मागणी केली. पोवार यांचा अंतरिम कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला. बीसीसीआयने कोचपदासाठी अर्ज मागविले असून, पोवार दुसऱ्यांदा या पदासाठी अर्ज करू शकतात. या दोन्ही खेळाडूंनी सीओएला पत्र लिहिले असून, पोवार कोचपदी कायम राहावेत, अशी मागणी केली.''
मानसी जोशी आणि एकता बिश्त तसेच वन डे संघाची कर्णधार मिताली या तिघी मात्र पोवार यांना पुन्हा कोच बनविण्याच्या विरोधात असल्याचे वृत्त आहे. हरमनप्रीत सांगितले की,'' रमेश पोवार यांनी आम्हाला उत्तम खेळाडू म्हणून घडवले आहे. तसेच त्यांनी प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हान उभे करण्याचे आणि आपल्या क्षमतेपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी भारतीय महिला क्रिकेटचा दृष्टीकोन बदलला आहे."
हरमनप्रीत आणि स्मृती यांच्या पांठीब्यामुळे पोवार पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार असल्याचे समजते आणि त्यांची निवड पक्की समजली जात आहे. भारतीय महिला संघ 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे.