नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी सातत्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर टीका केली आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना धोनी जाणीवपूर्वक हरला, अशी टीका योगराज यांनी केली होती. त्यावरून बरीच खळबळ माजली, परंतु आता योगराज यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली आहे. त्यांनी धोनी दिग्गज खेळाडू असल्याचे मत व्यक्त केले आहे.
योगराज यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की,''न्यूझीलंडने ठेवलेले माफक लक्ष्य धोनी पार करू शकला असता, पण त्याची तशी इच्छाच नव्हती. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणी भारतीय कर्णधाराने वर्ल्ड कप उचंवावा, हे त्याला नको होते. रवींद्र जडेजा खोऱ्यानं धावा करत होता, त्यावेळी भारत हे लक्ष्य पार करेल असे स्पष्ट चित्र होते. पण, धोनीनं त्यावेळी उपयुक्त खेळी केली नाही.'' पण, योगराज आता म्हणाले की,''मी असे कधीच म्हणालेलो नव्हतो. त्या पराभवासाठी मी धोनीला जबाबदार धरले नाही. ते माझे वक्तव्य नव्हते. चुकीच्या माणसाला चुकाची प्रश्न विचारला गेला होता. त्याने देशासाठी बरेच योगदान दिले आहे. तो एक दिग्गज खेळाडू आहे. मीही धोनीचा फॅन आहे.''
महेंद्रसिंग धोनीचं स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पाऊल; पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवातभारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. देशसेवा करण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं धोनीनं उचललेलं हे पहिलं पाऊल म्हणावं लागेल. भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरू येथील मुख्यालयात धोनी बुधवारी दाखल झाला. लष्कराचं प्रशिक्षण मिळावं म्हणून धोनीनं भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून दोन महिन्यांची विश्रांती मागितली होती. निवड समितीनंही त्याची ही विनंती मान्य केली, शिवाय भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला सैन्याबरोबर सराव करण्याची परवानगी दिली आहे. तो 31 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर खोऱ्यात जवानांसोबत पाहारा देणार आहे.