विरार : भारताकडून कसोटी पदार्पण करत पृथ्वीने शतक पूर्ण करताच पालघर जिल्ह्यातील विरार शहरामध्ये जल्लोष करण्यात आला. मूळचा विरारचा असलेल्या पृथ्वीच्या धमाकेदार शतकानंतर येथे दणक्यात जल्लोष झाला. यावेळी ज्या क्लबमध्ये पृथ्वीने क्रिकेटचे धडे गिरवले त्या अमेय स्पोटर््स अकॅडमीमध्ये केक कापून पृथ्वी शॉ याच्या शतकाचा आनंद साजरा करण्यात आला.
मुंबई क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला पृथ्वी दररोज विरार ते आझाद मैदान असा प्रवास वडिल पंकज शॉ यांच्यासह करायचा. वांद्रेच्या रिझवी स्प्रिंगफिल्डमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही त्याचा विरार - चर्चगेट लोकल प्रवास काही वर्ष सुरु होता. यानंतर प्रवासाचा थकवा टाळण्यासाठी पंकज यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला असला, तरी पृथ्वीला विरारकरांचा विसर पडला नाही. जेव्हा कधी वेळ मिळायाचा तेव्हा पृथ्वी आपल्या जुन्या घरी येत असे. पृथ्वीने वयाच्या १२व्या वर्षापर्यंत अमेय क्लबमध्ये प्रशिक्षण संतोष पिंगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. ‘आमच्याकडे आज १६ वर्षांखालील १० मुले व २२ मुली प्रशिक्षण घेत असून पृथ्वीच्या यशानंतर या सर्वांना प्रोत्साहन मिळेल. त्याच्याकडून प्रेरणा घेत आता भविष्यात अनेक चांगले खेळाडू येथून घडतील,’ अशी प्रतिक्रीया पिंगुळकर यांनी यावेळी दिली. यावेळी अमेय क्लबचे संस्थापक राजीव पाटील, क्लबचे पदाधिकारी यांच्यासह प्रशिक्षणार्थी खेळाडूंनी केक कापून पृथ्वीच्या यशाचा आनंद साजरा केला.
पृथ्वीची तुलना सचिनशी करणे योग्य नाही. त्याची कारकिर्द आत्ताच सुरु झाली आहे. पण या दोघांच्या फलंदाजीत फरक आहे. सचिनच्या फलंदाजीत संयम थोडा जास्त होता, पण पृथ्वी जास्त आक्रमक आहे. जर पृथ्वी कायम आपला नैसर्गीक खेळ करत राहीला, तर त्याची कारकिर्द चांगलीच बहरू शकते. पृथ्वी १२ वर्षे माझयाकडून क्रिकेट शिकला. मी त्याच्या नैसर्गिक खेळाला कुठेही धक्का लावला नाही. त्याचा नैसर्गिक खेळ हा आक्रमक आहे. त्यामुळे यापुढेही त्याने अशीच फलंदाजी करत रहावी.
- संतोष पिंगुळकर, पृथ्वीचे पहिले प्रशिक्षक
Web Title: After the centenary of 'Earth'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.