ms dhoni csk । नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni After CSK Defeat) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सकडून (CSK vs RR) पराभव झाला. राजस्थानकडून झालेल्या पराभवानंतर धोनीच्या चाहत्यांनी धोनीचे एक ट्विट व्हायरल करून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३ धावांनी बाजी मारली. अखेरच्या षटकात धोनी षटकार ठोकून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण संदीप शर्माने चतुराईने गोलंदाजी केली आणि सीएसकेच्या चाहत्यांच्या आशेवर पाणी टाकले.
दरम्यान, सामना संपल्यानंतर धोनीने संदीप शर्माचे तोंडभरून कौतुक केले. सीएसकेच्या चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे धोनीने अखेरच्या चेंडूवर षटकार न ठोकल्याने काहींनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. धोनीच्या टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीएसकेच्या चाहत्यांनी धोनीच्या जुन्या ट्विटचा दाखला देत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. व्हायरल होत असलेले धोनीचे हे ट्विट २४ मार्च २०१४ रोजीचे आहे. या ट्विटमध्ये धोनीने लिहिले आहे की, "कोणता संघ जिंकला याने काही फरक पडत नाही, मी इथे फक्त मनोरंजनासाठी आहे."
तर धोनी अद्याप आयपीएल खेळत आहे हेच आमच्यासाठी पुरेसे असल्याची भावना चेन्नईच्या चाहत्यांमध्ये आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला ४ सामन्यांतील २ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध चेन्नईने विजय मिळवला आहे. राजस्थानने सीएसकेविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या होत्या. १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने २० षटकांत ६ बाद १७२ धावा केल्या आणि संघाला ३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
अखेरच्या षटकात मोठा ट्विस्टराजस्थान आणि चेन्नई यांच्या सामन्यातील अखेरचे षटक महत्त्वाचे ठरले. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ६ चेंडूत १९ धावांची आवश्यकता होती. खेळपट्टीवर धोनी होता पण समोर संदीप शर्माचे आव्हान होते. धोनीची स्फोटक फलंदाजी पाहून गोलंदाज दबावात येतो. संदीप शर्मा देखील अखरचे षटक टाकताना दडपणात दिसला आणि त्याने सलग दोन Wide चेंडू टाकले. त्यानंतर धोनीने सलग दोन षटकार खेचले अन् ३ चेंडू ७ अशी मॅच आली. १ चेंडूंत ५ धावांची गरज असताना माही स्ट्राईकवर आला अन् धोनीला एकच धाव घेता आली. चेन्नईने ६ बाद १७२ धावा केल्या अन् राजस्थानने ३ धावांनी जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"