नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतर आंतरराष्टÑीय सामन्यांच्या तुलनेत लीग क्रिकेटचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होऊ नये, अशी अपेक्षा आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये प्रवासबंदी असल्याने आंतरराष्टÑीय क्रिकेटचे पुनरागमन होण्यासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता धूसर असल्याचे अश्विनला वाटते. कसोटी क्रिकेट सर्वांत वेगवान ३५० गडी बाद करणारा भारताचा हा अनुभवी फिरकी गोलंदाज म्हणाला, ‘शरीराने साथ दिल्यास कसोटी क्रिकेटमधील शानदार खेळी पुढेही सुरूच राहील.’ सोबतच अश्विनने चार दिवसांच्या कसोटीचा प्रस्ताव फेटाळून लावला.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या कार्यक्रमात संजय मांजरेकरसोबत सहभागी झालेला अश्विन म्हणाला, ‘अनेक देशांच्या आंतरराष्टÑीय सीमा प्रवासासाठी बंद आहेत. कोरोनामुळे असे काही बदल होऊ नयेत की आंतरराष्टÑीय क्रिकेटच्या तुलनेत लीग क्रिकेटला प्रोत्साहन देणे सुरू व्हावे. क्रिकेट नेमके कधी सुरू होईल, याबाबत मात्र निश्चित भविष्यवाणी करणे कठीणच आहे.’
मी स्वत:ला टी-२० चा व्यावसायिक खेळाडू समजतो मात्र मला सर्वाधिक यश हे कसोटी क्रिकेटमध्येच मिळाले आहे. शरीराने साथ दिल्यास कसोटी क्रिकेटमध्ये यापुढेदेखील यशस्वी कामगिरी करीत राहीन. टी-२० त व्यावसायिक खेळाडू तर आहेच पण कसोटीतही अनुभव आणि समर्पितवृत्तीच्या बळावर दमदार कामगिरीसाठी कटिबद्ध राहीन,’असे अश्विन म्हणाला. आयसीसीच्या चार दिवसांच्या कसोटीला आपला मुळीच पाठिंबा नसल्याचे सांगून अश्विनने चार दिवसांचा कसोटी सामना आपल्याला कधीही प्रोत्साहन देत नसल्याचे सांगितले.