इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमावरील संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघातील दोन खेळाडूंसह 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आयपीएलच्या बायो-बबल सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. त्यात आता बीसीसीआयच्या वैद्यकीय सदस्यांपैकी एकाला कोरोना झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या 14 झाली आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी सर्व संघ महिनाभर आधीच दुबईत दाखल झाले आहेत. सहा दिवसांचा क्वारंटाईऩ कालावधी पूर्ण करून 8पैकी 7 संघ सरावालाही लागले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा क्वारंटाईन कालावधी वाढला आहे. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह 11 सपोर्ट स्टाफचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चेन्नईच्या खेळाडूंची तपासणी करताना बीसीसीआयच्या वैद्यकीय सदस्याला कोरोना झाल्याचा दावा केला जात आहे.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान होणार 20000 चाचण्या, त्यासाठी 10 कोटी खर्च
बीसीसीआयनं ट्विट केलं की,''आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व नियमांचे काटेकोर पालन केलं जात आहे. संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाल्यानंतर आम्ही खेळाडूंची कोरोना चाचणी केली आणि त्यांना क्वारंटाईन राहण्यास सांगितले. 20 ते 28 ऑगस्ट या कालावधीत आम्ही 1988 कोरोना चाचणी केल्या. त्यात खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापक, बीसीसीआय स्टाफ, आयपीएल ऑपरेशनल टीम, हॉटेल व ग्राऊंड ट्रान्सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे.''
''यात दोन खेळाडूंसह आतापर्यंत 13 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सदस्यांना आयसोलेट केले गेले आहे. आयपीएलच्या वैद्यकीय टीमकडून त्यांची तपासणी केली जात आहे. आयपीएलच्या नियमानुसार सातत्यानं सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे,''असेही बीसीसीआयनं स्पष्ट केलं. या संपूर्ण लीगदरम्यान 20 हजार कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्यासाठी बीसीसीआय 10 कोटी खर्च करणार आहेत.