Venkatesh Prasad On KL Rahul । नवी दिल्ली : भारतीय फलंदाज लोकेश राहुलबाबत माजी भारतीय खेळाडू व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली होती. एकीकडे व्यंकटेश प्रसाद लोकेश राहुलवर टीका करताना दिसत होता, तर दुसरीकडे आकाश चोप्राने राहुलच्या समर्थनात आवाज उठवला होता. दोघांचे 'ट्विटर वॉर' हळूहळू चर्चेचा मुद्दा बनले. व्यंकटेश प्रसादने आकाश चोप्राला तर राहुलचा एजंट देखील म्हटले होते. यावरून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने देखील राहुलची पाठराखण करून टीकाकारांना सुनावले.
मी सीमा ओलांडली नाही - व्यंकटेश प्रसाद
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात लोकेश राहुलने शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यानंतर व्यंकटेश प्रसादने राहुलचे कौतुक केले होते. मात्र, आता त्याने राहुलबाबत केलेल्या ट्विटबाबत मौन सोडले आहे. 'सीएनएन न्यूज 18' वर बोलताना तो म्हणाला, "मी कोणाच्याही विरोधात नाही, पण मला जे वाटते ते मी सांगतो. मी फक्त लोकेश राहुलबद्दल बोललो असे नाही. चमकदार कामगिरी करणाऱ्या सरफराज अहमदबद्दलही मी माझे मत व्यक्त केले होते. मला खात्री आहे की मी सीमा ओलांडली नाही. काहींनी याला गांभीर्याने घेतले आहे तर काहींनी त्यावर टीकाही केली आहे." खरं तर माजी खेळाडूंना प्रसिद्धीसाठी मसाला लागतोच अशा शब्दांत गौतम गंभीरने व्यंकटेश प्रसादच्या विधानाचा समाचार घेतला होता.
व्यंकटेश प्रसादचा सावध पवित्रा
"हे पाहा, मला लोकेश राहुलबद्दल खूप आदर आहे. मी त्याला 16 वर्षाखालील क्रिकेटपासून मागील 15 वर्षांपासून पाहत आहे. त्याला फॉलो केले आहे आणि NCA, भारतीय क्रिकेट संघासह अनेक ठिकाणी त्याच्यासोबत काम केले आहे. त्याला अनेकवेळा संधी मिळाल्या आहेत, ज्या त्याच्यासाठी पुरेश्या आहेत. मला खात्री आहे की पुढील काही महिन्यांत तो आणखी चांगले करेल, परंतु मला जे वाटले ते मला सांगायचे होते", अशा शब्दांत प्रसादने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: After criticizing KL Rahul, Venkatesh Prasad has now taken a cautious stance following Gautam Gambhir's statement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.