चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. शुक्रवारी संघातील गोलंदाज दीपक चहरसह 10 स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. या धक्क्यातून सावरण्यापूर्वी शनिवारी CSKला आणखी एक धक्का बसला. संघाचा उप कर्णधार आणि प्रमुख खेळाडू सुरेश रैनानं कौटुंबिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि तो यंदाची आयपीएल खेळणार नाही. त्यानंतर आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड असे त्याचे नाव असल्याचे समोर येत आहे.
गायकवाडनं 2016-17च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघाकडून पदार्पण केलं. त्याच वर्षी त्यानं आतंरराज्य ट्वेंटी-20 स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं. ऑक्टोबर 2018मध्ये त्याला भारत ब संघाकडून देवधर ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर ACC एमर्जिंग टीम आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. डिसेंबर 2018मध्ये चेन्नई सुपर किंग्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यातील सामन्यात त्यानं नाबाद 187 धावा चोपल्या होत्या. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19 सामन्यांत 1193 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20त त्यानं 28 सान्यांत 843 धावा चोपल्या आहेत. नाबाद 82 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतलाचेन्नई सुपर किंग्सनं शनिवारी ट्विटवर पोस्ट करून माहिती दिली. ''सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे,''असे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले.