नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला असून ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र अफगाणिस्तान आणि भारत या संघांना सुपर-4 च्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला पहिल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले. बुधवारी झालेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने 1 बळी राखून निसटता विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे सुपर-4 मध्ये पराभूत झालेल्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
अफगाणिस्तानविरूद्ध पाकिस्तानच्या संघाने निसटता विजय मिळवल्याने अफगाणिस्तानचे चाहते चांगलेच संतापले आहेत. सामना पार पडताच अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये चांगलाच राडा केला. तसेच पाकिस्तानी चाहत्यांना देखील मारहाण केली. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला जाब विचारला आहे. अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारचा राडा केला असल्याचे म्हणत अख्तरने या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
शोएब अख्तरने विचारला जाब शोएब अख्तरने ट्विट करत म्हटले, "अफगाणिस्तानचे चाहते हे काय करत आहेत. त्यांनी मागील अनेक वेळा हेच केले आहे. हा एक खेळ आहे आणि तो योग्य भावनेने खेळला जावा आणि घेतला जावा. @ShafiqStanikzai जर तुम्हाला खेळात प्रगती करायची असेल तर तुमची गर्दी आणि तुमचे खेळाडू या दोघांना काही गोष्टी शिकण्याची गरज आहे." अशा शब्दांत अख्तरने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रश्न उपस्थित केले.