आयपीएलच्या या मोसमात CSK चं (CSK In IPL 2022) नशीब खूप वाईट सुरू असल्याचं दिसून येत आहे. संघाला सलग ४ पराभवांचा सामना करावा लागला आहे. संघाच्या सलग ४ पराभवांमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. सीएसकेच्या अशा वाईट स्थितीवर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक विधान केलं आहं ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या टी20 टाईम आऊट शोमध्ये बोलताना माजी प्रशिक्षक म्हणाले की, "सीएसकेनं रवींद्र जडेजाला कर्णधार करण्याची चूक केली. जडेजासारख्या खेळाडूने आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला हवं होतं. जडेजाला कर्णधारपदी नियुक्त करून CSK नं चुकीचा निर्णय घेतला आहे"
'मला असं वाटतं की जडेजासारख्या खेळाडूचं संपूर्ण लक्ष फक्त क्रिकेटवर असलं पाहिजे, चेन्नईनं फॅफ ड्यू प्लेसिसला संघातून वगळून मोठी चूक केली आहे. सीएसकेने ड्यू प्लेसिसला कर्णधार बनवायला हवं होतं. धोनीला संघाचं कर्णधारपद द्यायचं नव्हतं, तर ड्यूप्लेसिसकडे जबाबदारी देता आली असती. जडेजानं केवळ एक खेळाडू म्हणून खेळायला हवं होतं जेणेकरून हा खेळाडू खुल्या मनानं मैदानात उतरू शकेल. कोणतेही दडपण न घेता त्याला खेळता आलं असतं. कर्णधारपदाच्या दडपणाचा जडेजाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे", असं रवी शास्त्री म्हणाले.
सीएसकेसाठी या हंगामात काहीही चांगलं घडताना दिसत नाहीय. संघाला सतत पराभवाला सामोरे जावं लागत आहे. सीएसकेला दीपक चहरची उणीव जाणवत आहे. फलंदाज फॉर्मात नाहीत. ऋतुराजचा सततचा फ्लॉप संघासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे हे दोनच फलंदाज आहेत जे सीएसकेसाठी धावा करत आहेत.
दुसरीकडे गोलंदाजीतही संघाची कामगिरी देखील चांगली दिसत नाही. ब्राव्होने आतापर्यंत फक्त ६ विकेट्स घेतल्या आहेत, जडेजाच्या फिरकीची जादूही चालत नाहीये. तर मोईन अली देखील अद्याप संघात दिसलेला नाही. आता CSK त्यांचा पुढचा सामना १२ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी खेळणार आहे.