रोहित नाईक
मुंबई : ‘इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्या डावानंतर शार्दुलने संपर्क साधला, तेव्हा मी त्याला अतिघाई केल्याने दम भरला होता. कारण त्याने स्वत:ची विकेट फेकली होती. अजून नीट खेळला असता, तर त्याला मोठी खेळी करता आली असती. त्यानंतर त्याने सुधारणा करून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले, याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूरचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांनी ‘लोकमत’कडे दिली. लाड यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘हिटमॅन’ रोहित शर्मा घडला असून एकाच सामन्यात आपल्या दोन्ही शिष्यांनी मोलाचे योगदान दिल्याचा आनंद असल्याचेही लाड यांनी सांगितले.
शार्दुलने दमदार अष्टपैलू खेळासह भारताला इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. याविषयी लाड म्हणाले की, ‘शार्दुल एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे खेळला. शार्दुल सामनावीर म्हणून योग्य ठरला असता. त्याला पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख आहे.’ शार्दुलच्या फलंदाजीविषयी लाड म्हणाले की, ‘मी कायमच फलंदाजांना ‘व्ही’मध्ये (फलंदाजाच्या समोरच्या दिशेने) खेळण्याचा सल्ला देतो. शार्दुलने सरळ बॅटने समोर मारलेले फटके पाहून आनंद झाला. ‘व्ही’मध्ये खेळल्याशिवाय तुम्ही चांगले क्रिकेटपटू होऊ शकत नाही असे मला वाटतं. शार्दुलची पूर्वीची फलंदाजी म्हणजे केवळ फटकेबाजी. खेळपट्टीवर तग धरायचा हे त्याला माहीत नव्हते. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाण्याआधी मी शार्दुलच्या ग्रीपमध्ये (बॅट पकडण्याची पद्धत) काहीसा बदल केला. त्यावर मेहनत घेऊन त्याने फलंदाजी सुधारली.
निर्णय न चुकल्याचा आनंद!रोहित आणि शार्दुल यांचा खेळ पाहून त्यांच्या पालकांना मी शाळा बदलून माझ्याकडे पाठविण्यास सांगितले होते. हा निर्णय खूप जोखमीचा होता. कारण दोघांची प्रगती झाली नसती, तर मी दोषी ठरलो असतो. पण रोहित-शार्दुलने माझा निर्णय सार्थ ठरविला असून याचा मला सर्वाधिक आनंद आहे. - दिनेश लाड’