कोलकाता : महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दोन लढतींमधील वैयक्तिक कामगिरीनंतर निराश झाले होते, असा खुलासा भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने केला आहे. मी प्रशिक्षक तुषार अरोठे यांना अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्यास सांगितले होते, असेही झूलन म्हणाली.अरोठे यांनी मात्र अनुभवी वेगवान गोलंदाजाची पाठराखण केली. झूलनला कर्णधार मिताली राजचाही पाठिंबा मिळाला आणि अखेर भारताला अंतिम फेरी गाठून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार समारंभात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते झूलनचा सत्कार करण्यात आला.झूलन म्हणाली, ‘‘प्रशिक्षकाच्या प्रेरणादायी शब्दांमुळे माझ्यात नवा उत्साह संचारला आणि मितालीच्या साथीने आपल्या खेळावर विशेष लक्ष केंद्रित केले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत झूलनने एका चांगल्या चेंडूवर कर्णधार मेग लॅनिंगला खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा मार्ग दाखविला. भारताने उपांत्य फेरीच्या या लढतीत ३६ धावांनी विजय मिळविला.’’झूलनने सांगितले, ‘‘आॅस्ट्रेलियाविरुद्धची लढत आमच्यासाठी महत्त्वाची होती. आॅस्ट्रेलिया जगातील सर्वोत्तम संघ आहे. लॅनिंग सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मी तिला अचूक मारा करण्यास प्रयत्नशील होते. लॅनिंगला जो चेंडू टाकायचा आहे, तसा चेंडू सरावादरम्यान मितालीला करण्याचा प्रयत्न केला. मितालीने मला फिडबॅक दिला. सुदैवाने सर्व काही आमच्या मनाप्रमाणे घडले.’’ (वृत्तसंस्था)मी विश्वकप स्पर्धेत पहिल्या टप्प्यातील लढतींमधील वैयक्तिक कामगिरीनंतर निराश झाली होती. विंडीजविरुद्ध लढतीनंतर मी प्रशिक्षक तुषार यांना सांगितले, की चांगली गोलंदाजी करीत नसल्यामुळे तुम्ही मला संघातून वगळू शकता. ते म्हणाले, की नाही तुझी संघाला गरज आहे. तू गोलंदाजीचे नेतृत्व करीत आहेस. -झूलन गोस्वामीविश्व टी-२० आयोजन सर्वांत मोठा अनुभव : गांगुलीकोलकाता : माजी क्रिकेटपटू ते यशस्वी प्रशासक असा प्रवास करणारा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर २०१६ च्या विश्व टी-२०ते आयोजन जीवनातील सर्वांत मोठा अनुभव असल्याचे म्हटले आहे.सप्टेंबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर गांगुलीची २०१६ च्या सुरुवातीला बंगाल क्रिकेट संघटनेच्या (कॅब) अध्यक्षपदी वर्णी लागली. त्या वेळी गांगुली प्रशासकाच्या भूमिकेत नवखा होता. या भूमिकेमुळे मात्र माझे डोळे उघडले, असे गांगुलीने म्हटले आहे.कॅबच्या वार्षिक पुरस्कार समारंभादरम्यान बोलताना गांगुली म्हणाला,‘मी कारकीर्दीत ४०० पेक्षा अधिक सामने खेळले असतील, पण विव स्पर्धेचे यजमानपद भूषविणे जीवनातील सर्वांत मोठा अनुभव होता.’गेल्या वर्षी ईडन गार्डन्सवर विश्व टी-२० च्या अंतिम सामन्यासह स्पर्धेतील पाच सामन्यांचे आयोजन करण्यात आले. वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करीत या स्पर्धेत जेतेपद पटकावले होेते.गांगुलीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रशंसा करताना धरमशाला येथे विरोध झाल्यानंतर भारत-पाक लढतीचे ईडन गार्डन्सवर आयोजन करण्यासाठी समर्थन करण्याच्या आठवणींना उजाळा दिला.गांगुली म्हणाला,‘आयसीसीने मला दूरध्वनीवरुन ईडन गार्डन्सवर भारत-पाक लढतीच्या आयोजनाबाबत विचारणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री कुठल्यातरी कार्यक्रमात व्यस्त होत्या. मी त्यांना एसएमएस केला. त्यांनी लगेच उत्तर दिले. ४५ मिनिटांमध्ये मला त्यांच्या कार्यालयातून लढतीसाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याची तयारी असल्याचे आश्वासन पत्र मिळाले.’महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा सत्कार केल्यानंतर भारतीय महिला संघाच्या कामगिरीवर बोलताना गांगुली म्हणाला,‘विश्वकप स्पर्धेची रविवारी खेळल्या गेलेली अंतिम लढत माझ्या चांगल्या स्मरणात आहे. माझ्या आईने यापूर्वी मी खेळत असताना क्रिकेट सामना बघितला होता. त्यानंतर तुम्ही खेळत असताना बघितला. ती माझ्यासोबत बसली होती आणि झुलन जिंकावी, अशी आशा व्यक्त करीत होती. त्यामुळे झुलन तुम्ही निराश होऊ नका, महिला विश्व टी-२० (पुढील वर्षी) आणखी एक संधी मिळणार आहे.’(वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पहिल्या दोन लढतीनंतर निराश झाले होते
पहिल्या दोन लढतीनंतर निराश झाले होते
महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दोन लढतींमधील वैयक्तिक कामगिरीनंतर निराश झाले होते, असा खुलासा भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने केला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:38 AM